अनधिकृत तेंदुपत्ता संकलन: तेंदुपत्ता घेऊन कंत्राटदार पसार
वनविभागाच्या कारवाईनंतर ठेकेदाराचा पोबारा
सुशील ओझा, झरी: पंचायत अनुसूचित क्षेत्र विस्तार कायद्याने आदिवासी ग्रामसभांनाच वनउपज व गौनखनिजाची मालकी दिली आहे. मात्र, त्या उपरही झरी तालुक्यातील भीमनाला व शिराटोकी पोडा अंतर्गत येणाऱ्या जंगल क्षेत्रात बेकायदा तेंदुपत्ता संकलन होत आहे. अनधिकृत संकलन करणाऱ्या ठेकेदाराने आज चक्क ५९ गोणी तेंदुपत्ता घेऊन पोबारा केल्याने त्या विरोधात तक्रारीवरून वनविभागाच्या पथकाने कारवाई केली.
झरी व मारेगाव तालुक्यात काही संस्था व ठेकेदाराकडून आदिवासी ग्रामसभांना न जुमानता तेंदुपत्त्याचे संकलन केले जात आहे. स्वयंघोषित वनहक्क समित्या गठित करून हा गैरप्रकार केल्या जातो आहे. त्यामुळे शिराटोकी ग्रामसभेच्या अध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांसह राज्यपालांकडे तक्रारी केल्या आहे. त्या उपरही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामसभा अध्यक्षांनाच एकेरी शब्दात खुलासा मागण्याचा प्रताप केला. अशातच आज गैरविधायकपणे तेंदुपत्त्याचे संकलन करणाऱ्या ठेकेदाराने चांगलेच रंग दाखविले आहे. कुणालाही न जुमानता या ठेकेदाराने तेलंगणातील वरंगलच्या श्रीदेवी ॲण्ड कंपनी यांना अनधिकृत खरेदी केलेला ५९ गोणी तेंदुपत्ता अंदाजे किंमत ५ लाख रुपये यांना दिला. एका चारचाकी वाहनात भरून तो पसार झाल्याची तक्रार करण्यात आली.
