विलास ताजने, वणी: देशात एकीकडे डिजिटल इंडियाच्या बाता करीत शहराचा विकास होत आहे. मात्र त्याचवेळी महात्मा गांधींच्या विचाराचा खरा भारत विकासापासून कोसो दूर आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे वणी तालुक्यातील परमडोह येथील जिल्हा परिषद शाळा. ३ जून रोजी वादळी वाऱ्यामुळे परमडोहच्या जिल्हा परिषद शाळेचे छत उडाले होते. सरपंच आणि मुख्याध्यापकांनी मागणी करूनही जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाला जून महिना लोटूनही जाग आली नाही. परिणामी चिमुकल्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेच्या वरांड्यात पहिला दिवस घालवावा लागला. एकीकडे विद्यार्थ्यांच्या स्वागतार्ह शाळा सज्ज झाल्या होत्या. तर त्याचवेळी परमडोहच्या चिमुरड्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हरवले होते.
वणी तालुक्याला ३ जून रोजी वादळी पावसाचा फटका बसला होता. यातच परमडोहच्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे छत उडाले होते. २६ जून पासून शाळा सुरू होणार त्याअनुषंगाने प्रभारी सरपंच आणि मुख्याध्यापकाने संबंधित अधिकाऱ्यांना छताची डागडुजी करण्याची मागणी केली. मात्र मस्तवाल प्रशासनाने मागणीला केराची टोपली दाखवली. बुधवारला शाळेची पहिली घंटी वाजली. विध्यार्थी नव्या जोमाने नव्या वर्गात बसण्याच्या उत्साहात शाळेत आले. मात्र शाळेची अवस्था पाहून चिमुरड्यांचीही मन खिन्न झाली.
