मध्यरात्री भाविकांच्या उत्साहात साजरा झाला श्रीकृष्ण जन्मोत्सव

आज स. 11 वा. दहिहंडी व महाप्रसाद, सं. 4.30 वा. निघणार भव्य शोभायात्रा

11

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील अमृत भवन येथे रात्री भाविकांच्या प्रचंड उत्साहात श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. संध्याकाळी 7 वा सुंदरकांड व जपचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान जन्माष्टमी समितीच्या महिला सदस्यांनी सादर केलेल्या नृत्य नाटिका प्रमुख आकर्षण ठरल्यात. मध्यरात्री 12 वाजता महाआरती करण्यात आली. यावेळी बाळकृष्ण आणि गोपिकांच्या वेशातील चिमुकल्यांनी लक्ष वेधले होते. तत्पुर्वी सोमवारी स. 11 वाजता विजय चोरडिया यांच्या निवासस्थानाहून पालखी यात्रा निघाली. आज मंगळवारी दुपारी 11 वाजता अमृत भवन येथे दहीहांडी तसेच गोपाळकाला व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर सं. 4.30 वाजता महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेली भव्य शोभायात्रा अमृत भवन येथून निघणार आहे.  या शोभायात्रेचे विविध देखावे, ढोल पथक, भजन मंडळ प्रमुख आकर्षण राहणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे अध्यक्ष ऍड. कुणाल विजय चोरडिया यांनी केले आहे. 

वाजत गाजत निघाली पालखी यात्रा
सोमवारी दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता विजय चोरडिया यांच्या निवासस्थानावरून श्रीकृष्ण मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक निघाली. या पालखी यात्रेत ढोल ताशांच्या गजरात भाविक महिलांनी तसेच बाळ गोपाळांनी नृत्य केले. यावेळी कुणाल चोरडिया यांनी देखील भाविकासोबत ठेका धरला. सजवलेल्या पालखीची मिरवणूक काढून अमृत भवन येथे मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली. संध्या. 7 वा. अमृत भवन येथे सुंदरकांड पाठ झाले. यावेळी जन्माष्टमी समितीच्या महिला सदस्यांनी श्रीकृष्ण लीलांचे नाट्य रुपांतरण व छोट्या छोट्या नृत्य नाटिका सादर केल्या. या सादरीकरणाला उपस्थित भाविकांची चांगलीच दाद मिळाली.

रात्री 10 वाजेपासून मुख्य अशा जन्मोत्सव उत्सवाला सुरुवात झाली. मध्यरात्री 12 वाजता महाआरती घेण्यात आली. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. भाविकांनी गुलाल उधळून व फटाके फोडून जन्म सोहळा साजरा केला. जन्मोत्सवानिमित्त अमृत भवनला विद्युत रोशनाईची सजावट करण्यात आली होती. जन्म सोहळ्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले. जन्मोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. आज मंगळवारी दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी 11 वाजता अमृत भवन येथे दहीहांडी तसेच गोपाळकाला व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. 

रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा – ऍड कुणाल चोरडिया
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही जन्माष्टमी निमित्त भव्य शोभायात्रा वणीतून निघणार आहे. या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण देखावे (झांकी) राहणार आहे. शोभायात्रेसाठी सुप्रसिद्ध भजन पथक, ढोलपथक येणार आहे. या शोभायात्रेला मोठ्या संख्येने हजेरी लावावी अशी सर्वांना विनंती आहे.
– ऍड कुणाल विजय चोरडिया, अध्यक्ष श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.