केंद्रशासनाच्या हमी भावानुसार कापूस खरेदी सुरू करा

कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांची मागणी

9

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सध्या स्थानिक बाजारपेठेतील दर हे हमी दरापेक्षा कमी आहेत. परिणामी शेतक-याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या आधारभूत दरानुसार वणी विभागांतर्गत कापूस खरेदी करावी, अशी मागणी कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादन पणन महासंघ, मुंबई यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन दिले आहे.

केंद्र शासनाने हंगाम 2023-24 साठी कापसाला हमी भाव जाहीर केला आहे. मात्र हमी भावापेक्षा कमी दराने सध्या कापूस खरेदी सुरू आहे. वणी व परिसरात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. मजुरांची कमतरता, खते, बि-बियाणे इत्यादी यामुळे कापूस उत्पादनाचा खर्च वाढला आहे. त्या तुलनेत कापसाला मिळणार भाव हा अत्यल्प आहे. परिणामी शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. कमी भावामुळे अनेक शेतकरी आत्महत्येचे पाऊल देखील उचलत आहेत.

वणी तालुक्यात वणी केद्रावर, मारेगाव तालुक्यात मारेगाव व मार्डी केंद्रावर, झरी जामनी तालुक्यात मुकुटबन तसेच केळापूर तालुक्यात पांढरकवडा या केंद्रावर त्वरित केंद्र शासनाच्या आधारभूत किंमतीनुसार कापूस खरेदी करावी, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देते वेळी संजय खाडे, पुरुषोत्तम आवारी, राजाभाऊ पाथ्रडकर, गोहोकर, प्रमोद वासेकर, सुनील वरारकर, प्रा. शंकर व-हाटे, महेश पावडे, तेजराज बोढे, बंडू मालेकर इत्यादी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.