दहा हजारासाठी अल्पवयीन मुलाला निर्जन ठिकाणी नेऊन जबर मारहाण

5 तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल, दोघांना अटक

69

 

जितेंद्र कोठारी, वणी : मित्राने घेतलेल्या 10 हजार रुपयांच्या वसुलीसाठी अल्पवयीन मुलाला जबर मारहाण करण्यात आली. मुलाच्या आईने 22 ऑक्टो. रोजी वणी पोलिसात घटनेबाबत तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करून दोघांना तात्काळ अटक केली. युवी मोगरे (24) व साहिल मुने (25) रा .वणी असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या अल्पवयीन मुलाच्या मित्राने 2 वर्षापूर्वी सेवानगर येथील युवी मोगरे कडून 10 हजार रुपये उधार घेतले होते. युवी मोगरे यांनी पैसे परत मागितले असता त्याच्या मित्राने फिर्यादीच्या मुलाचे नाव सांगितले. तेव्हा युवी मोगरे हा फिर्यादीच्या मुलाला वारंवार धमकी देऊन पैसे मागत होता. 

दिनांक 19 ऑक्टो. रोजी रात्री 8.30 वाजता फिर्यादीचा अल्पवयीन मुलगा टिळक चौक येथे आइस्क्रीम गाडीजवळ उभा होता. त्यावेळी आरोपी युवी मोगरे, साहिल मुने व त्याचे इतर 3 मित्र तिथे आले. त्यांनी मुलाच्या शर्टची कॉलर पकडुन बळजबरीने दुचाकीवर बसविले. त्यांनी मुलाला एस.पी.एम. रोडने शाळा क्रमांक 3 च्या मागे अंधारात नेऊन सर्वांनी मिळून त्याला लाथाबुक्यांनी मारहाण करुन 10 हजाराची मागणी केली.

आरोपीच्या तावडीतून सुटका करण्यासाठी मुलाने आता माझ्याजवळ इतके पैसे नाही, असे म्हटले असता आता 3 हजार दे आणि उद्या 7 हजार घेवून ये नाही तर चाकूने तुला ठार करतो, अशी धमकी दिली. तसेच त्याला अश्लील शिवीगाळ केली. अशी तक्रार केली.

वणी पोलिसांनी आरोपी युवी मोगरे (24) रा. सेवानगर, साहिल मुने (25) रा .सिद्धी विनायक मंगल कार्यालय मागे वणी तसेच त्याचे इतर 3 साथीदार विरुद्ध कलम 143, 147, 149, 294 व 386 भादवि अन्वये गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व पो. नि. अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात सहा.पो.नि. दत्ता पेंडकर करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.