वर्धा नदीच्या पात्रातून बोटीद्वारे वाळूचा अवैध उपसा

0 602

वणी (रवि ढुमणे): वणी तालुक्यातील भुरकी-रांगणा या गावाच्या हद्दीला लागूनच असलेल्या भद्रावती तालुक्यातील मनगाव येथील वर्धा नदीच्या पात्रात यंत्राच्या बोटीने राजरोसपणे वाळूचा उपसा केला जात आहे. हा उपसा भुरकी येथील दोन शेतकऱ्यांच्या हद्दीतून बोटीद्वारे केला जात आहे. मात्र या अवैध वाळू उपशाला प्रशासनाचं अप्रत्यक्ष पाठबळ मिळत असल्याने वाळू माफियांना जणू रानच मोकळे झाले आहे. या अवैध वाळू उपशामुळे मात्र शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.

वणी तालुक्यातील भुरकी घाटालगत असलेल्या भद्रावती तालुक्यातील मनगाव येथील घाटात घाटाचा लिलाव घेणाऱ्या कंत्राटदाराने वाळू उपसा करण्यासाठी थेट पाण्यात चालणारी यंत्राची बोट आणून नदीच्या पाण्यातून त्या यंत्राद्वारे वाळू उपसा करायला सुरुवात केली आहे. शासनाच्या नियम व अटीप्रमाणे उपसा करण्यासाठी कोणत्याही यंत्राचा वापर करण्याची मुभा नाही. मात्र मनगाव रेती घाट लिलाव घेणाऱ्या कंत्राटदाराने प्रशासकीय यंत्रणा आपल्या बाजूने वळवीत राजरोसपणे अवैध वाळू उपसा करायला सुरुवात केली आहे. लगतच असलेल्या रांगणा शिवारातील अनिल सोनटक्के व लांबट यांच्या शेत सर्वे क्रमांक 75/1 व 75/2 या शेतकऱ्याच्या हद्दीत असलेल्या शेताच्या हद्दीमधून पाण्यातून वाळू उपसा करायला सुरुवात केली आहे.

नियमबाह्य वाळूचा उपसा होत असताना स्थानिक प्रशासन व अधिकारी मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष करून वाळू माफियांना जणू पाठबळच देत आहेत. वर्धा नदीच्या वाळूला जिकडे तिकडे मागणी आहे. लिलाव घेणारे कंत्राटदार स्थानिक घाटात मुजोरी करीत वाळूचा उपसा करत असल्याचे बघायला मिळत आहे. या अवैध वाळू उपशात शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष पुरविण्याची गरज आहे.

वणी महसूल विभाग अनभिज्ञच
वणी महसूल विभागाच्या हद्दीत येणाऱ्या रांगणा शेत शिवारातील शेत सर्वे क्रमांक 75/1 व 75/2 या भुरकी येथील अनिल सोनटक्के व नानाजी लांबट या दोन शेतकऱ्यांच्या शेताच्या हद्दीतून वरोरा येथील वाळूचा लिलाव घेणाऱ्या कंत्राटदाराने मुजोरी करीत वणी महसूल विभागाच्या हद्दीतून दोन बोटीद्वारे वाळू उपसा करणे सुरू केले आहे. मात्र भद्रावती महसूल हद्दीतील घाटाचा लिलाव घेणारा कंत्राटदार वणी महसूल हद्दीतून वाळूचा उपसा करीत असताना वणी महसूल विभाग अनभिज्ञच असल्याचे दिसत आहे. आता महसूल विभाग शेतकऱ्यांना न्याय देईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.