महिलेच्या गळ्यातून भरदिवसा सोन्याची पोत हिसकविली

अज्ञात दुचाकीस्वार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

12

जितेंद्र कोठारी, वणी: पोळ्याची खरेदी करण्यासाठी वणीत पतीसोबत आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या तरुणाने धूम स्टाईल लंपास केले. देशमुखवाडी भागात शुक्रवारी सायंकाळी 5.20 वाजता ही घटना घडली. याबाबत रंजना दिनेश येरमे (40) रा. नायगाव (खु.) यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

प्राप्त माहितीनुसार फिर्यादी महिला पती दिनेश येरमे सोबत दुचाकीवर वणी येथे सणानिमित्त खरेदी करण्यासाठी आली होती. दरम्यान मोटरसायकलची चैन खराब झाल्यामुळे दिनेश यांनी बीएसएनएल ऑफिस समोर नागतुरे यांच्या गॅरेजमध्ये दुरूस्ती साठी मोटरसायकल आणली. फिर्यादी रंजना येरमे रस्त्याच्या कडेला उभी असताना पांढऱ्या रंगाच्या ऍक्टिवा दुचाकीवर तोंडाला स्कार्फ बांधलेला एक युवक जवळ येऊन थांबला.

त्यानंतर थोड्यावेळाने डाव साधून ऍक्टिवास्वार युवकाने रंजनाच्या गळ्यातील पोत हिकावून तिथून पळ काढला. ज्यात दोन सोन्याचे डोरले व मणी असे 3 ग्रामची पोत किंमत अंदाजे 7 हजार रुपये होती. 

रंजना हिने आरडाओरडा केला असता गॅरेजमध्ये काम करणाऱ्या काही युवकांनी दुचाकीने चोरट्याचा पाठलाग केला. मात्र चोरट्यानी धूम स्टाईल दुचाकी चालवत पळून जाण्यास यशस्वी झाला. फिर्यादी रंजना दिनेश येरमे रा. नायगाव (खु.) ता. वणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 379 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.