डीएव्ही पब्लिक स्कूलच्या स्थानांतरणाबाबत पालक संतप्त

सुंदरनगर येथील शाळा घुग्घुसला नेण्यास विरोध... वणी परिसरातील सुमारे 500 विद्यार्थ्यांना फटका, पालकांनी घेतली खासदारांची भेट

17

जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील निलजई कॉलोनी, सुंदर नगर येथील डीएव्ही पब्लिक स्कूल सध्या काही कारणांमुळे घुग्घूस येथे स्थानांतरीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा वणी व परिसरातील 400 ते 500 विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. त्यामुळे पालक संतप्त झाले असून त्यांनी आज गुरुवारी दिनांक 17 फेब्रुवारी रोजी खासदार बाळू धानोरकर यांची भेट घेत याबाबत निवेदन सादर केले. सदर शाळा वणी परिसरातच असावी यासाठी शासन स्तरावर मदत करावी अशी मागणी पालकांनी केली आहे. एक ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या संस्थेची शाळा वणी परिसरातच राहावी यासाठी कॅम्पेन राबवण्यात येणार असून याला अधिकाधिक पाठिंबा द्यावा असे आर्जव पालकांनी केले आहे.  

देशातील सुप्रसिद्ध डीएव्ही कॉलेज मॅनेजमेन्ट कमिटी द्वारा संचालित ही शाळा आहे. या संस्थेच्या महाराष्ट्रात अवघ्या 12 शाळा आहेत. वेकोलि कर्मचा-यांच्या पाल्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळावे हा उद्देश ठेऊन सुंदर नगर येथे 1997 साली ही शाळा सुरू करण्यात आली. या संस्थेची यवतमाळ जिल्ह्यातील ही एकमेव शाखा आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या या शाळेची उत्कृष्ट शिक्षणासाठी ओळख आहे. त्यामुळे वणी व परिसरातील सुमारे 400 ते 500 विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहे. मात्र सध्या ही शाळा घुग्घुस येथे स्थानांतरीत करण्याचे प्रयत्न सुरू आहे.

काय आहे स्थानांतरण प्रकरण?
उत्कृष्ट शिक्षण, सोयीसुविधा, शिक्षणासाठी अत्याधुनिक साहित्य, उत्कृष्ट शिक्षक, कलागुणांना प्रोत्साहन, ऐतिहासिक पार्श्वभूमी यामुळे वणी परिसरात ही शाळा प्रसिद्ध आहे. इथे प्रवेशासाठी पालकांची पहिली पसंती असते. सुंदर नगर हा परिसर वेकोलिच्या खाणीच्या क्षेत्रात असल्याने शाळेखालील जमिन कोळसा उत्पादनामुळे पोकळ झाली आले. कोळसा काढण्याच्या प्रक्रियेत होणा-या ब्लास्टमुळे या शाळेच्या भिंतींना तडे गेले आहे. त्यामुळे पुढला धोका लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापनाने सदर शाळा घुग्घुस येथे स्थानांतरीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

ही माहिती समोर येताच पालक संतप्त झाले आहे. एक उपक्रमशील शाळा परिसरातून दुस-या जिल्ह्यात जाऊ नये यासाठी पालक प्रयत्न करीत आहे. शाळा घुग्घुसला गेल्यास 400 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना व पालकांना याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे या शाळेचे स्थानांतरण रोखावे यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यासाठी पालकांनी आज खासदार बाळू धानोरकर यांची वरोरा येथे भेट घेतली. दरम्यान खासदारांनी त्यांना पर्यायी जागा, इत्यांदी तांत्रिक समस्या दूर करून ही शाळा जिल्ह्याबाहेर जाऊ न देण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणार असे आश्वासन दिले आहे.

निवेदन देते वेळी विजय पांडे, अरुण आंबोरे, इम्रान सय्यद, जयश्री आसेकर, प्रीती आसेकर, सीमा पुनवटकर, रविंद्र गजभीये, तुषार अतकरे, पारस नगराळे, धनंजय गाडगे, विनोद पारखी, अनुज मुकेवार, संजय लेडांगे, अतुल डफ यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

डीएव्ही शैक्षणिक संस्थेला ऐतिहासिक महत्त्व
डीएव्ही कॉलेज मॅनेजमेन्ट कमिटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना 1886 रोजी महर्षी दयानंद सरस्वती यांनी लाला लजपत राय यांच्या सहकार्याने केली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिक या संस्थेच्या शाळा, कॉलेजमधून आले आहे. अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या संस्थेची शाळा आपल्या परिसरात आहे ही एक गौरवास्पद बाब आहे. मात्र ही शाळा दुस-या जिल्ह्यात जात असल्याने पालक संतप्त झाले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.