शोएब खानचे मैदानावर तांडव… षटकारांची बरसात करत नाबाद 63 धावा

पेंटर व राहुल सिंगचे सातत्याने उत्कृष्ट प्रदर्शन... मारोती मोहितेचे 11 धावा देऊन 4 विकेट्स... चिखलीच्या आमदार श्वेता महल्ले यांनी दिली तुर्नामेंटला भेट

19

विवेक तोटेवार, वणी: आजचा दिवस होता एम ब्लास्टर संघाचा शोएब खान याचा. त्याने शेवटच्या तीन षटकात मैदानावर सिक्सरची बरसात करत धुंवाधार 63 रन्स काढले. तर जन्नतचा खेळाडू पेंटर व किंग्ज 11 चा राहुल सिंग याची आज देखील बॅट तळपली. त्यानी जबरदस्त फटकेबाजी करीत सामन्यांमध्ये रंगत आणली. तर किंग 11 च्या  मारोती मोहिते याने आपल्या बॉलिंगची जादू दाखवत 2 षटकात 11 धावा देत 4 गडी बाद केले. आमेर 11 अद्यापही पहिल्या क्रमांकवर आहे.  दरम्यान आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महल्ले यांनी तुर्नामेंटला भेट दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

गुरुवारी दिनांक 13 ऑक्टोबर रोजी T-10 चा 8 वा दिवस
पहिला सामना हा छत्रपती वारीअर्स विरुद्ध राजपूत रॉयल्स यांच्यात खेळला गेला. छत्रपती संघाने प्रथम फलंदाजी करीत निर्धारित 10 षटकात 9 बाद 57 धावा केल्या. छत्रपती संघाकडून विपुल पटेल याने 4 चौकाराच्या मदतीने 28 धावा केल्या. 58 धावांचे आव्हान हे काही कठिण नव्हते. त्यामुळे राजपूत संघ हा सामना सहज खिशात टाकेल अशी शक्यता निर्माण झाली. मात्र राजपूत संघाची सुरवात खराब झाली. त्यामुळे सहज वाटणारा सामनाही शेवटच्या ओव्हरमध्ये रंगतदार वळणावर आला.

शेवटच्या षटकाचा थरार
शेवटच्या षटकात राजपूत संघाला विजयासाठी 7 धावांची गरज होती व छत्रपती संघाला गरज होती ती 2 विकेट्सची. शेवटचे षटक भूषणने टाकले. घेऊन आले. त्यानंतर 2 चेंडूत दोन धावा घेण्यात आल्या. आता 4 चेंडूत 6 धावा हव्या हव्या होत्या. 3 ऱ्या चेंडूत अरविंद बेलेकर हा त्रिफळाचीत झाला. त्याच्या 4 थ्या चेंडूत कर्णधार विनोद निमकर धावबाद झाला. हा सामना छत्रपती संघाने 5 धावांनी जिंकला. छ. संघातर्फे 28 धावा काढणा-या विपुल पटेल याला सामनावीर ठरविण्यात आले. या सामन्यात अष्टपैलू रजनिश पांडे याने 12 रन्स देत 3 विकेट्स देखील घेतल्या. राजपूत संघाकडून सचिन मडावी याने सर्वाधिक 14 धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला धावसंख्येचा दुहेरी आकडाही पार करता आला नाही. सलग दोन सामने जिंकून छत्रपती संघाने तुर्नामेंटमध्ये जबरदस्त कमबॅक केले आहे.

दुसरा सामना हा माऊली मराठा विरुद्ध एम ब्लास्टर यांच्यात खेळला गेला. एम ब्लास्टर संघाने प्रथम फलंदाजी करीत 5 गडी बाद 100 धावा केल्या. एम ब्लास्टरची सुरूवात संथ झाली. एम ब्लास्टर संघांच्या 7 षटकात फक्त 40 धावा होत्या मात्र शेवटच्या 3 षटकात कर्णधार शोएब खान याने षटकारांची बरसात करत तूफानी बॅटिंग केली. शोएबने 28 चेंडूत दोन चौकार व 6 षटकाराच्या मदतीने नाबाद 63 धावा काढल्या व माऊली संघासमोर 101 धावांचे टारगेट ठेवले. माऊली संघाचा कोणताही खेळाडू खेळपट्टीवर टिकू शकला नाही. व संपूर्ण संघ 9.1 षटकात 55 धावाच करू शकला. हा सामना एम ब्लास्टर संघाने 45 धावांनी अगदी सहजपणे जिंकला. एम ब्लास्टर संघाकडून उमेश बोडे याने 2 षटकात 18 धावा देत 3 गडी बाद केले. शोएबला सामनावीर ठरवण्यात आले.

सिक्सर मारूनच शोएबने साजरे केले अर्धशतक

वणीकर भाग्यवान – श्वेता महल्ले, आमदार
आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महल्ले यांनी तुर्नामेंटला भेट दिली. मान्यवरांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसीलदार निखिल धुळधर, प्रीती बिडकर, संध्या अवताडे, श्रीकांत पिदूरकर, विजय चोरडिया, ऍड कुणाल चोरडिया, ख्याती चोरडिया यांची प्रमुख उपस्थिती होती. अशी ऐतिहासिक स्पर्धा वणीत होत असल्याने वणीकर भाग्यवान आहे. अशा स्पर्धा झाल्यास खेळाडुंना प्रोत्साहन मिळून खेळाचा प्रसार प्रचार वाढेल, असे मनोगत व्यक्त करत श्वेता महल्ले यांनी आयोजकांचे कौतुक व अभिनंदन केले.

तिसरा सामना हा किंग्ज 11 विरुद्ध श्रीराम वारीअर्स यांच्यात खेळला गेला. श्रीराम संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीराम संघाने 8 बाद 84 धावा केल्या. श्रीराम संघाकडून मारोती परचाके याने 22 चेंडूत 2 चौकार व 3 षटकारच्या मदतीने सर्वाधिक 39 धावा ठोकल्या. 85 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना किंग्ज 11 ने 8 गडी व 1 षटक राखून हा सामना सहजरित्या जिंकला. किंग्ज 11 कडून आकाश सिडाम (33) व कर्णधार राहुल सिंग याने 17 चेंडूत धडाकेबाज नाबाद 31 धावा केल्या. किंग्ज 11 संघाचा मारोती मोहिते याला सामनावीर ठरविण्यात आले. त्याने 2 षटकात 11 धावा देत 4 गडी बाद केले.

चौथा सामना हा जन्नत 11 विरुद्ध रेनबो क्रिकेट क्लब यांच्यात खेळला गेला. जन्नत संघाने प्रथम फलंदाजी करीत 6 बाद 85 धावा केल्या. जन्नत संघाकडून रणजित (23) व अक्षय धावंजेवार उर्फ पेंटर याने 16 चेंडूत 3 चौकार व 3 षटकारच्या मदतीने धुंवाधार 31 धावा केल्या. धावांचा पाठलाग करतांना रेनबो संघ 8 बाद 57 धावापर्यंतच मजल मारू शकला. रेनबो संघाकडून तोहीत खान याने सर्वाधिक 27 धावा केल्या. अक्षय धावंजेवार उर्फ पेंटर याला सामनावीर ठरविण्यात आले.

पाचवा सामना हा 11 टायगर रोअरिंग विरुद्ध आमेर नाईट रायडर यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करीत 11 टायगर संघाने 9 बाद 70 धावा केल्या. परंतु पॉईंट टेबलवर प्रथम क्रमांकारावर असलेल्या संघाकरिता हे लक्ष मोठे नव्हते. 71 धावांच्या लक्षाचा पाठलाग करतांना आमेर संघाने हे लक्ष 9.1 ओव्हरमध्ये 6 गडी गमावून पूर्ण केले. सामन्याचा सामनावीर आमेर संघाचा संदीप खिरटकर याला ठरविण्यात आले. त्याने 2 षटकात 9 धावा देत 2 गडी बाद केले.

अंकतालिका
1) आमेर नाईट रायडर – 13
2) माऊली मराठा -10
3) एम ब्लास्टर – 9
4) जन्नत 11 – 9
5) राजपूत रॉयल्स – 8
6) रेनबो – 8
7) किंग्ज 11 – 7
8) 11 टायगर रोअरिंग -6
9) श्री राम वारीअर्स – 6
10) छत्रपती वारीअर्स – 4

पाहा दिवसभरातील संपूर्ण मॅच…

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.