लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीशी खोड्या, व्हेलेंटाईन डेलाच प्रियकराला बेड्या

4 वर्षांच्या प्रेम प्रकरणाचा लग्नास नकार देऊन ब्रेकअप

28

भास्कर राऊत, मारेगाव: मुलीच्या घराजवळच मुलाचे परिचित राहायचे. त्या परिचिताच्या घरी मुलगा यायचा. एक दिवस अचानक त्याची शेजारी राहणा-या एका मुलीवर नजर पडली. पहिल्या नजरेत प्रेम झाले. मुलाच्या चकरा वाढल्या. दोघांचे प्रेम बहरत गेले. दोघांमध्ये संबंध निर्माण झाले. मात्र आधी लग्नाला हो म्हणून लाडाई गोडाई करणारा प्रेमवीर अचानक बदलला. त्याने लग्नास नकार दिला. अखेर फसवणूक झाल्याचे कळताच मुलीने मारेगाव पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली व ऐन व्हेलेंटाईन डेलाच मजनू गजाआड झाला.

अंकित सोयाम (22) असे प्रेमवीराचे नाव असून तो वणी तालुक्यातील गणेशपूर येथील रहिवासी आहे. 4 वर्षांआधी आरोपी अंकितचे मारेगाव येथील एका मुलीशी सुत जुळले. अंकित मुलीच्या घरी कुणी नसताना तो तिला भेटायचा जायचा. अशातच दि. 29 जानेवारी 2023 ला नेहमीप्रमाणे तो मुलीच्या घरी गेला. लग्नाचे आमिष दाखवत त्याने मुलीशी शारीरिक संबंध ठेवले.

अनेक दिवसांच्या प्रेम संबंधामुळे प्रेयसीने मुलाला लग्नासाठी विचारले, मात्र आधी लाडाई गोडाई करणारा प्रियकर अचानक बदलला. त्याने प्रेयसीला लग्न करण्यास नकार दिला. शिवाय तुला जे करायचे आहे ते कर अशी धमकीही त्याने दिली. चार वर्षाचे प्रेम अचानक तुटल्याने मुलीला धक्का बसला. तिने ही घटना आपल्या आईवडिलांना सांगितली.

मुलीने पालकांना सोबत घेऊन थेट मारेगाव पोलीस स्टेशन गाठले. झालेल्या प्रकरणावरून पोलिसांनी आरोपी अंकित सोयाम विरुद्ध भादंविच्या कलम 376, 376 (3), 506 गुन्हा दाखल केला व आरोपीला अटक केली. पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.