सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दारू विक्रेते एमआरपीपेक्षा जादा दराने दारूची विक्री करीत आहे. यामुळे ग्राहकांची मोठी आर्थिक लूट होत आहे. जादा दराने दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई कधी करणार, असा सवाल उत्पादन शुल्क विभागाला नागरिकांनी केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यापासून तालुक्यातील देशी दारू दुकानदार व बीयर बारचालकांची चांदी होत आहे. तालुक्यातून दररोज शेकडो पेटी देशी व विदेशी दारूची तस्करी चंद्रपूर जिल्ह्यात व तालुक्यातील बहुतांश गावात केली जात आहे. दारू तस्करीतून दिवसाकाठी लाखोची उलाढाल होत आहे. मुकुटबन, मांगली, झरी, पाटण, सतपल्ली या गावांत एकूण ६ देशी दारू दुकान व १२ बीयरबार असून, यातील बहुतांश दुकानातून ही दारू तस्करी होत आहे. काही दारू दुकानदार चिल्लर भावाच्या नावाने पोत्यात पव्वे टाकून विक्री करीत आहे तर काही दुकानदार दारूच्या शिशीवरील लेबल काढून दारूची विक्री करीत आहे.
