मुख्य मार्गांवर उभ्या राहणाऱ्या ट्रक व इतर वाहनांवर कार्यवाही करा

यापुढे उभ्या वाहनामुळे अपघात झाल्यास तीव्र आंदोलन, शिवशक्ती वाहतूक सेनेचा इशारा

44

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या काही दिवसांपासून मुख्य मार्गांवर उभ्या असलेल्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहे. यात अनेकांना जीवही गमावावा लागला आहे. तर अनेकांना अपंगत्व आले आहे. रस्त्यांवर उभी राहणारी वाहने अपघातास कारणीभूत ठरत असून या वाहनांवर कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी शिव शक्ती वाहतूक सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा पोलिस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. यावर जर प्रशासनाने कारवाई केली व यापुढे उभ्या वाहनामुळे अपघात झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा शिवशक्ती वाहतूक सेनेच्या प्रशांत चंदनखेडे यांनी दिला आहे. 

वणी तालुक्यात अनेक कोळसाखानी, कोलडेपो व लाइमस्टोन डोलोमाईटच्या खाणी आहेत. त्यामुळे रस्त्यांवरून कोळसा व खनिजांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. कोलडेपो मधूनही कोळशाची सतत वाहतूक सुरु असते. कोल वॉशऱ्यांमुळे कोळसा वाहतुकीच्या वाहनांमध्ये आणखीच भर पडली आहे. कोळसा व खनिजांची वाहतूक करणारे शेकडो ट्रक रस्त्याने सुसाट धावत असतात. वणी शहर व तालुक्यात ट्रान्सपोर्ट कंपन्यांचं जाळं पसरलं आहे. अनेक ट्रान्सपोर्ट कंपन्यांचे कॅम्प अगदीच रस्त्यावर असल्याने वाहने रस्त्यावर उभी करून वाहनांच्या दुरुस्तीचे काम केले जाते. तासंतास वाहने रस्त्यावर उभी असतात. कोल वॉशरी व कोलडेपो मध्येही वाहतूक करणारे ट्रक रस्त्यावरच ठिय्या मांडून उभे असतात. रात्रीही ट्रक रस्त्यावर तासंतास उभे ठेवले जातात.

ट्रकच्या मागील भागाला रेडियम, ब्रेक लाईट, इंडिकेटर लावणे गरजेचे असतांनाही अनेक ट्रक मालक या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे रात्रीला रस्त्यावर उभे असलेले ट्रक छोट्या वाहनधारकांच्या दृष्टीस पडत नाही. या रात्रीच्या वेळेला रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या ट्रकांवर दुचाक्या आदळून अनेक निष्पाप जीवांचे बळी गेले आहेत.

वणी-यवतमाळ, वणी-वरोरा, वणी-घुग्गुस व वणी-मुकुटबन या मार्गांनी मोठ्या प्रमाणात कोळसा व खनिजांची वाहतूक सुरु असते. या मार्गांवर रात्रीला नियमबाह्य पद्धतीने ट्रक उभे केले जातात. मागील दोन ते तीन महिन्यात या मार्गांवर अनेक भीषण अपघात झाले आहेत. हे मुख्य मार्गांवर उभे राहणारे ट्रक रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्या छोट्या वाहनधारकांसाठी कर्दनकाळ ठरू लागले आहेत. तेंव्हा या रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या ट्रकांवर कार्यवाही करून ट्रक मालकांना ताकीद देण्यात यावी.

यापुढे उभ्या ट्रकमुळे अपघात झाला अथवा ट्रकमुळे निष्पाप दुचाकीस्वारांचा जीव गेल्यास शिव शक्ती वाहतूक सेने कडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. शिवाय रस्त्यांवर बेजाबदारपणे उभे करण्यात येणाऱ्या ट्रकांमुळे अपघात झाल्यास ट्रक मालकांना दोषी ठरवून त्यांच्यावर उचित कार्यवाही करण्याची मागणी शिव शक्ती वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत चंदनखेडे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

निवेदनावर शिवशक्ती वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष गजेंद्र घरत, जिल्हा उपाध्यक्ष पप्पू सिरसाट, तालुकाध्यक्ष सचिन मडावी, सदस्य विजय कलारे, नितीन कर्णेवार, अरुण कुळसंगे, सतिश जोगी, बलराज खैरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.