मारेगावातील विश्रामगृहाजवळ भीषण अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार

अज्ञात वाहनाची धडक, दुचाकीस्वाराच्या डोक्याचा चेंदामेंदा

सुरेश पाचभाई, बोटोणी: मारेगावहून गावी परत जाणा-या एका दुचाकीस्वाराच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने भीषण धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. आज संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. विकास बबन डाहुले (29) असे मृतकाचे नाव असून तो तालुक्यातील म्हैसदोडका येथील रहिवाशी होता.

विकास हा शेती करायचा. आज सोमवारी दिनांक 31 जानेवारी रोजी तो त्याच्या हिरो होन्डा या दुचाकीने कामानिमित्त मारेगाव येथे आला होता. दरम्यान संध्याकाळी गावी परतत असताना विश्राम गृहाजवळ विकासच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने भीषण धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की यात विकासच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला.

अपघात झाल्याची माहिती घटनास्थळावरील लोकांनी तात्काळ पोलीस स्टेशनला दिली. धडक देणारे वाहन ट्रक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विकासच्या पश्चात पत्नी, 1 मुलगी, आई-वडील व बहिणी असा आप्त परिवार आहे.

दुचाकीस्वारांनी हेलमेट वापरण्याचे आवाहन
काम, नोकरी, बाजार इत्यादी कारणांसाठी मोठ्या प्रमाणात लोक तालुक्याच्या ठिकाणी दुचाकीने येतात. तसेच अनेक लोक नोकरी व इतर कामांसाठी दुचाकीने परगावी जातात. अवजड वाहनांची रहदारी, खराब रस्ते किंवा वन्य प्राणी आडवे आल्याने अपघाताच्या घटना नित्याच्याच आहे. तालुक्यात एका महिन्यात अनेकांना अपघातामुळे जीव गमवावा लागतो. या अपघातात सर्वाधिक मृत्यू हे डोक्याला गंभीर ईजा झाल्याने होतात. अनेक तरुण तसेच घरातील कर्त्याधर्त्या व्यक्तींना डोक्यावर केवळ हेलमेट नसल्याने जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे फक्त डोक्यावर हेलमेट असल्याने अनेकांचा जीव वाचला आहे. त्यामुळे दुचाकी चालकांनी हेलमेटचा वापर करावा असे आवाहन ‘वणी बहुगुणी’तर्फे करण्यात येत आहे. 

Lead Story