वणी बहुगुणी डेस्क: गेल्या चार दिवसांपासून वेगाव येथील बेपत्ता असलेल्या ओमराज सूर्यभान राजूरकर (45) यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास मारेगाव तालुक्यातील करणवाडी शिवारात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. रविवारी दिनांक 24 डिसेंबरच्या संध्याकाळपासून ते खडकी हायवेवरून बेपत्ता झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांतर्फे ते बेपत्ता झाल्याची पोस्ट सोशल मीडियातील विविध गृपमध्ये फिरत होती. मात्र गुरुवारी दिनांक 28 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह करणवाडी शिवारातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतकाच्या पश्चात पत्नी, दोन मुली व आप्त परिवार आहे. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र काही दिवसांपासून त्यांची मानसिक प्रकृती ठिक नसल्याचे बोलले जात आहे. गेल्या दोन दिवसात मारेगाव तालुक्यात 3 आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे.