भास्कर राऊत, मारेगाव: मार्डा डॅम येथील पुलावर सुरक्षा कठडे नसल्याने पुलावरील धोका वाढलेला आहे. याकडे संबंधीत विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एखादी अनुचित घटना घडल्यावरच प्रशासन याकडे लक्ष देणार का? असा प्रश्न नागरिक विचारत आहे.
यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या वर्धा नदीवर दांडगाव-मुक्टा तसेच मार्डा दरम्यान वर्धा नदीवर पाणी अडवून डॅम बांधण्यात आला आहे. या डॅमचे पाणी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे असलेल्या वर्धा पॉवरप्लांट तसेच जी.एम.आर. या दोन प्लॅन्टसाठी येथील पाण्याचा वापर केला जातो.
या डॅमचा यवतमाळ जिल्ह्याला कोणताही फायदा होत नाही. उलट नुकसान मात्र यवतमाळ जिल्ह्याचेच जास्त होत असते. यात जनावरे तर तसेच काही व्यक्तीही बुडून मरण पावले आहेत. तसेच पुराच्या पाण्याने होणारे शेतकऱ्यांचे नुकसान ही नित्याचीच बाब झाली आहे. मारेगाव तालुक्यातील मार्डी कुंभा परिसराला मोठी बाजारपेठ म्हणून वरोरा ही जवळ पडते. तसेच वर्धा नदीवरील डॅममुळे वरोरा जाणे सोयीचे झाले आहे.
मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसाने या पुलावर असलेले लोखंडी कठडे पडलेले होते. पुलाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. सध्या पुलावर मोठे खड्डेसुद्धा पडलेले आहे. आवश्यकता नसताना या पुलावर गतिरोधकही देण्यात आले आहे. एका बाजूने कठडे नसल्याने दोन्ही बाजूनी एकाच वेळी वाहने आली तर कधी बॅलेन्स जाऊन याठिकाणी मोठा अपघात सुद्धा घडू शकतो.
संबंधीत विभागाला याबाबत संपूर्ण माहिती असूनही याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या पुलावर तात्काळ सुरक्षा कठडे बसवावे अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहे.