जेव्हा चक्क संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई शाळेत अवतरतात…

सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिवस उत्साहात साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, आदी भावंडं चक्क शाळेत आलेले दिसतात. तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर गोड स्मित फुलतं. निमित्त होतं मराठी भाषा गौरव दिनाचं. स्वावलंबी शिक्षण संस्थेद्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये तिथं नुकताच मराठी भाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २७ फेब्रुवारी हा दिवस म्हणजे प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक, कवी, कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.

कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम झालेत. यावेळी अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य प्रवीण कुमार दुबे होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. माधवी लाभे यांनी आपल्या प्रास्ताविकातून मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेतील विविध महान ग्रंथ व साहित्यिकांची माहिती सांगितली.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रवीण कुमार दुबे यांनी मराठी भाषेला अधिकाधिक संपन्न करण्यासाठी व तिच्या समृद्धीसाठी ज्या साहित्यिकांनी आपले जीवन व्यतीत केले. त्यांच्याबद्दल आपण ऋणी असले पाहिजे असा संदेश दिला. सोबतच प्रत्येकाने मराठी भाषेतील साहित्याचा अभ्यास करून तिची कीर्ती जगामध्ये दुरवर पसरवली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पलक शिरभाते तसेच आभार प्रदर्शन रेशमा दोडेवार यांनी केले. कार्यक्रमाचा यशस्वी आयोजनाकरिता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलेत.

dnyaeshwarLead Storymarathi bhasha gaurav dinSaint.sushganga schoolWani