विलास ताजने,(मेंढोली): कोळसा भरलेला भरधाव ट्रक कोलगाव जवळील वळणावर उलटल्याची घटना आज (दि.२७) शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वणी तालुक्यातील मुंगोली कोळसा खाणीतून सकाळच्या वेळी ट्रक क्र. एम.एच. २९ ए टी ७६५ हा कोळसा घेऊन वणी कडे जात होता.कोलगाव (साखरा) जवळील वळणावर भरधाव ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात घडला.
मुंगोली, विरुर, कोलगाव खाणीतून कोळसा वाहतूक करणारे ट्रक भरधाव वेगाने ये-जा करतात. काही चालक डिझेल वाचविण्यासाठी ट्रक न्यूट्रल करुन चालवितात. तसेच कोळसा भरण्याच्या हेतूने ट्रकचा नंबर लवकर लावण्याकरिता वाहने भरधाव वेगाने चालवितात. भरधाव वाहन चालकांवर कुणाचेही नियंत्रण राहिले नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे.