वणीत रास्ता रोको व जेलभरो आंदोलन, काही काळ वाहतूक विस्कळीत

92 विदर्भवाद्यांना अटक व सुटका

जब्बार चीनी, वणी: वणीत साई मंदिरासमोर आज गुरुवारी दि. 26 ऑगस्ट रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी 92 विदर्भवाद्यांना काही वेळासाठी ताब्यात घेण्यात आले व नंतर त्यांची सुटका करण्यात आली. वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसह इतर मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. रास्तारोकोमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

केंद्र सरकार स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा निर्णय घेत नसल्यामुळे विदर्भातील जनतेमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. सरकार कडून गेली 60 वर्षांपासून विदर्भावर सातत्याने अन्याय होत आहे. शेतकरी आत्महत्या, कुपोषण, नक्षलवाद, वीजदरवाढ, विदर्भातील युवकांच्या नोकऱ्या पळवणे असा अन्याय होत आहे. त्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समिती कडून सन 2023 साठी विदर्भ मिशन अंतर्गत ऍक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे.

या अंतर्गत आंदोलनाची रूपरेषा आखण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणुन आज संपूर्ण विदर्भात विदर्भातील 11 ही जिल्ह्यात आणि 120 तालुक्यात रास्तारोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून वणी शहरातील साई मंदिर समोर यवतमाळ रोड येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

य़ावेळी स्वतंत्र विदर्भ राज्याची त्वरित निर्मिती करा व विदर्भातील जनतेसाठी विजेचे दर निम्मे करा, वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, लेके रहेंगे लेके रहेंगे विदर्भ राज्य लेके रहेंगे, विदर्भ के गद्दारो को जुते मारो— को अशा घोषणा देण्यात आल्या. रास्ता रोको आंदोलनामुळे यवतमाळ मार्गावर काही वेळापुरता चक्काजाम झाला होता. परंतु पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्यामुळे हा रास्ता रोको फार काळ ठेवता आला नाही. काही वेळात वाहतूक सुरळीत सुरू झाली. दरम्यान 92 आंदोलकांना पोलिसांनी काही काळासाठी ताब्यात घेत नंतर त्यांची सुटका केली.

यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पुरुषोत्तम पाटील, रफिक रंगरेज, देवराव धांडे, राहुल खारकर, राजू पिंपळकर, अमित उपाध्ये, संजय चिंचोळकर, प्रमोद खुरसाने, राजकीरण कहाते, अजय पोहणे, दशरथ पाटील, बालाजी काकडे, बाळकृष्ण राजूरकर, विनोद मुसळे, अलका मोहाडे, शालिनी रासेकर, राहुल झट्टे, कमलेश भगत, सुरेखा वडीचार, नीलिमा काळे, मंदा तामगडगे, गीता दोरखंडे, चंद्रकला धूमने, मंजू मंदळे, कलावती क्षीरसागर यांचेसह मोठ्या संख्येने विदर्भवादी उपस्थित होते.

हे देखील वाचा:

ब्राह्मणी रोडवर खड्यात दुचाकी आदळून अपघात

नवरगाव येथे विष प्राशन करून इसमाची आत्महत्या

Lead StoryVidarbha AndolanVidarbha Andolan Samiti