जितेंद्र कोठारी, वणी : आपल्या देशात विज्ञान व तंत्रज्ञान या विषयांमध्ये शिक्षण घेऊन पदवीधर झालेल्या लोकांची संख्या फार मोठी आहे, पण विज्ञानाला आयुष्यात उतरवून काही तरी वेगळीच निर्मिती करणे हे किंचित लोकांनाच जमते. अशाच प्रकारची एक भन्नाट निर्मिती वणी येथील तरुणाने साकार करून राज्यातच नव्हे तर अख्या देशात वणी शहराचे नाव लौकिक केले आहे. हर्षल महादेव नक्षणे (27) असे या होतकरू तरुणाचे नाव आहे.
हर्षल यांनी हायड्रोजन लिक्विड इंधनावर धावणारी प्रदूषणमुक्त व सेल्फ ड्रायव्हिंग सोनिक कार घरीच तयार केली. 1 लिटर हायड्रोजन इंधनमध्ये 250 ते 300 किमी धावणाऱ्या या कारचे टायर आणि काच वगळता इतर पार्टस वणीतच तयार करण्यात आले. केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी हर्षल नक्षणे यांनी तयार केलेल्या सोनिक-1 कारचे कौतुक करून व्यावसायिक उत्पादन करण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
वणी येथील साधनकरवाडी येथे वास्तव्यास असलेले महादेव नक्षणे यांचे पुत्र हर्षलचे शालेय शिक्षण एसपीएम शाळेत झाले. त्यानंतर हर्षलने बालाजी पॉलिटेक्निक सावर्ला येथून पॉलिटेक्निकचे शिक्षण पूर्ण केले. हर्षलने 2021 मध्ये पुणे येथील सिम्बॉसिस कॉलेजमधून एम.टेक डिग्री मिळविली. पेट्रोल डीझलच्या वाढत्या किमती व वाहनांमुळे होणारे प्रदूषण लक्षात घेऊन हर्षलला ग्रीन हायड्रोझनवर चालणारी कार तयार करण्याची कल्पना सुचली.
घरच्या गच्चीवर उभारली फॅक्टरी
वणीतीलच कुणाल आसुटकर या मित्राच्या मदतीने अथक परिश्रम करून 2021 मध्ये आपल्या राहत्या घरी गच्चीवर कार निर्मितीचे कार्य सुरु केले. कारसाठी लागणारे सुटे पार्टस, बॉडी, दरवाजे तयार करण्यासाठी हर्षल यांनी वेल्डिंग मशीन, मोल्डिंग मशीन, स्प्रे मशीन व इतर यंत्र खरेदी केले. कारच्या इंजिनचे काही भाग बाहेरून खरेदी करण्यात आले. कारच्या विंडशिल्ड व टायर अहमदाबाद येथून बोलाविण्यात आले. विशेष म्हणजे कार धावण्यासाठी आवश्यक असलेले हायड्रोजन लिक्विड इंधन हर्षलने स्वतः तयार केले.
हायड्रोजनचालित कार बनविण्यात तब्बल 18 लाख रुपये खर्च झाले. सोबतच कारमध्ये स्वचालीत (self driving) सिस्टीम व सेन्सर बसविण्याचा खर्च 10 लाख रुपये आला. असे एकूण 28 लाख रुपय खर्च करून सोनिक-1 कार तयार झाली. कारचे रोडटेस्ट झाल्यावर जुलै 2022 मध्ये मुंबई येथे आयोजित एका ऑटोमोबाईल प्रदर्शनीत सोनिक-1 कारचे प्रदर्शन करण्यात आले.
हर्षलने तयार केलेल्या कारबाबत केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना माहिती होताच त्यांनी कार घेऊन नागपूर येथे त्यांचे घरी येण्याचे आमंत्रण दिले. हर्षलने निर्मिती केलेली प्रदूषणमुक्त कार बघून नितीन गडकरी यांनी त्याचे कौतुक केले. तसेच कारचे व्यावसायिक उत्पादनासाठी सरकारकडून आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासनही दिले. सध्या वणी शहराच्या रस्त्यावर दिसणारी सोनिक-1 कार वणीकर नागरिकांच्या कुतूहलाचा विषय बनली आहे.
आता वणीत स्लिप डिस्क व स्पॉंडीलीसिसच्या रुग्णांसाठी वरदान ठरलेली कायरोप्रॅक्टिक उपचार सुरू