भास्कर राऊत मारेगाव: बेंबळा प्रकल्प अंतर्गत मारेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी कालव्याचे कामे सुरू आहे. या कामावर पाणी पुरवठा करणारा टँकर कालव्यात कोसळून चालक जागीच ठार झाल्याची घटना आज 24 मार्च रोजी दुपारच्या सुमारास टाकली परिसरात घडली. शिवदास जयसिंग राठोड (64), रा. करंजी असे मृत टँकर चालकाचे नाव आहे.
मारेगाव तालुक्यामध्ये बेंबळा प्रकल्पाची कामे मोठया प्रमाणावर सुरु आहेत. तालुक्यातील कुंभा टाकळी परिसरात सुरु कालव्याच्या कामावर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येते. दरम्यान गुरुवार 24 मार्च रोजी दुपारी 2 वाजता सुमारास पाणी भरायला जात असताना टँकर कालव्यात कोसळला. या दुर्घटनेत टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला.मात्र पोलीस येण्यापूर्वीच टँकर सूव्यवस्थित करून ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत करीत आहे.