विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

पिकांना पाणी देताना घडली दुर्दैवी घटना

विलास ताजने, वणी : शेतातील वीज प्रवाहित तारेला नकळत स्पर्श होऊन एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना वणी तालुक्यातील चनाखा शिवारात दि. २२ सोमवारी सकाळच्या वेळी घडली. विजय श्रीवंत ढवस (वय ४८ ) असे मृतकाचे नाव आहे. सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

प्राप्त माहितीनुसार विजय ढवस हे सकाळी शेतात दुचाकीवरून गेले. शेतात पिकांना पाणी देतांना त्यांच्या हाताचा स्पर्श वीज प्रवाह सुरू असलेल्या तारेला झाला असण्याची शक्यता दिसून येते. शेतातील दुचाकी दिसताच बराच वेळ होऊनही मुलगा घराकडे का गेला नाही. म्हणून विजयचे वडील शेतात फिरून पाहत असतांना सदर प्रकार दुपारी लक्षात आला.
सदर घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती पोलिस पाटील ओमप्रकाश थेरे यांनी शिरपूर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. वणी येथे शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहे. मृतकाच्या मागे आई वडील, तीन मुली, जावई, भाऊ असा बराचसा परिवार आहे.
Lead Story
Comments (0)
Add Comment