जितेंद्र कोठारी, वणी: कोरोनाच्या संपूर्ण नायनाटसाठी संचारबंदी व कलम 144 लागू असताना वणी शहरातील नागरिकांकडून किराणा दुकानं, मेडीकल,भाजीपाला, पेट्रोलपंपावर तेल खरेदी करताना, बँकेत व एटीएमवर पैसे काढत असताना अजिबातच सोशल डिस्टेंसिंग पाळले जात नाही ! त्यामुळे लाॕकडाऊनमध्ये शहरात सोशल डिस्टेंसिंगला पुरती तिलांजली दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जनजागृती करून, समज देऊन तसेच दंड आकारूनही नागरिक नियमांचे पालन करीत नसल्यामुळे पोलिस प्रशासन देखील याबाबत हतबल झाल्याचे दिसत आहे. दरम्यान यवतमाळ येथे आयसोलेशन वॉर्डात दाखल असलेल्या आणखी एका रुग्णाचा अहवाल पॉझेटिव्ह आला आहे. त्यामुळे आता यवतमाळमध्ये कोविड-19 पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या एकूण 9 झाली आहे. त्यामुळे वणीकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
जिल्ह्यात पूर्वी प्रमाणेच कलम 144 व संचारबंदी लागू आहे. मात्र वणी शहरात गांधी चौक, आंबेडकर चौक, महाराष्ट्र बँक चौक, दीपक टॉकीज चौपाटी, साई मंदिर या भागात सकाळी 8 ते दुपारी 3 वाजे पर्यंत ग्रामीण भागातून आलेले व शहरातील नागरिकांचे भाजीपाला व इतर खरेदीसाठी दुकानांवर झुंबड दिसत आहे. लॉकडाउन दरम्यान शहर पोलिसांनी काही दिवस सतत पेट्रोलिंग करून अकारण फिरणाऱ्यावर कठोर कारवायांसुद्दा केली. परंतु मागील 8 दिवसापासून शहरात पोलीस प्रशासन आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार लॉकडाउन काळात दुचाकी वाहनांवर एक व्यक्ती व चारचाकी वाहनांमध्ये चालकसह दोन व्यक्तींना बसण्याची परवानगी आहे. मात्र शहरात दुचाकीवर तीन ते चार स्वारी तर ऑटो व कार मध्ये 4 ते 6 व्यक्ती बिनधास्त फिरत असताना पोलीस कारवाई का करीत नाही? बाजारात अनेक व्यक्ती तोंडावर मास्क न लावता मुक्त वितरण करताना पाहायला मिळत आहे. येथील नांदेपेरा मार्गावर सकाळी मॉर्निंग वॉक तर सायंकाळी इव्हनिंग वॉक करायला आबालवृद्ध फिरताना रोजचे दृश्य आहे.
शहरातील साई मंदिर, टिळक चौक, दीपक टॉकीज या ठिकाणी कायमस्वरूपी नेमलेले पोलीस कर्मचारी व होमगार्ड सुद्दा खुर्चीवर बसून मोबाईल हाताळताना नजरेत पडत आहे. एकूणच वणीकरांच्या या चुकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
यवतमाळ येथे आणखी एक कोरोना बाधीत रुग्ण सापडला