बहुगुणी डेस्क, वणी: पोलिसांच्या हातावर तुरी देत गेल्या आठ महिन्यांपासून बलात्कार, अपहरणाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीच्या चंद्रपूर येथून मुसक्या आवळण्यात आल्या. आजम शेख बाबा शेख (27) असे आरोपीचे नाव असून तो दुर्गापूर चंद्रपूर येथील रहिवासी आहे. त्याच्यावर अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. 11 जुलै 2023 रोजी वणी पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार, अपहरण, ऍट्रोसिटी तसेच पोक्सो अंतर्गत विविध कलमान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र तेव्हापासून तो फरार होता.
चंद्रपूर शहरात पोलिसांचे पथक शिवजयंती निमित्त बंदोबस्तावर होते. बंदोबस्त आटपून कर्मचारी घरी परतताना त्यांना फरार आरोपी आजम हा दुर्गापूर येथे त्याच्या घरी आल्याची गोपनिय माहिती खबरीकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
आरोपी जाळ्यात येताच याची माहिती वणी पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी तातडीने चंद्रपूर गाठत मध्यरात्री आरोपीला ताब्यात घेतले. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहरानी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक माधव शिंदे, पोलीस उपनिरीक्षक झोडेकर, विजय वानखडे, शुभम सोनूले, गजानन कुळमेथे आदींनी केली.