जितेंद्र कोठारी वणी : येथील मराठा सेवा संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती ते छत्रपती राजाराम महाराज जयंती निमित्ताने 19 ते 24 फेब्रुवारी 2022 दरम्यान छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 19 फेब्रु. रोजी शिवजयंती निमित्ति येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित महोत्सवाला अमरावती येथील मीडिया वॉच पब्लिकेशन चे संपादक अविनाश दुधे यांनी ‘सामान्य माणसांचा राजा : शिवाजी राजा’ या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर होते. उद्घाटक म्हणून श्री रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेड वणीचे अध्यक्ष संजय खाडे यांच्या हस्ते छत्रपती महोत्सवाचे रीतसर उदघाट्न करण्यात आले. स्वागताध्यक्ष म्हणून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांनी ‘कुणबी-मराठा समाजाच्या यशाची पंचसूत्री’ हा ग्रंथभेट देऊन मान्यवरांचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर लिखित आत्मचरित्र ‘शून्यांचा ताळमेळ’ व नवोदित साहित्यिक शिक्षिका आशाकला कोवे यांच्या ‘पाझर’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या वेळी ठाणे जिल्ह्यातील माहुली गडाशेजारी स्थित अतिशय दुर्गम असलेला वजीर सुळका सर करणाऱ्या वणी शहरातील ऋषभ बबन धानोरकर, मोहित सरोज, अशोक केला, घनश्याम संगीता लक्ष्मण काकडे या तरुण गिर्यारोहकांचा मान्यवरांच्या हस्ते ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवामध्ये संपन्न झालेल्या चित्रकला, निबंध आणि प्रकटवाचन या स्पर्धांमधील विजेत्यांना गौरवचिन्ह देऊन बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले.
छत्रपती महोत्सव कार्यक्रमात वणीचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार श्याम सोनटक्के, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष भारती राजपूत, शिव महोत्सव समितीचे अध्यक्ष शहाबुद्दीन अजानी, सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉ. प्रतिक कावडे, गोदावरी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप.सोसायटी वणीचे व्यवस्थापक विजय मोडक, फिजिओथेरपिस्ट अरुंधती उपरे, युवा उद्योजक बालाजी म्हसे हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सोनाली जेनेकर व रोहिणी मोहितकर यांनी केले. प्रास्ताविक संजय गोडे तर आभार प्रदर्शन मसेसंघ वणीचे सचिव नितीन मोवाडे यांनी केले. या महोत्सवास वणीकर शिवप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.