विलास ताजने, मेंढीली- वणी उपविभागात पावसाने दीर्घकाळ दडी मारली आहे. सोयाबीन पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. तर कपाशी फुले, पात्यावर आहे. ऐन पिकांना फळधारणेच्या वेळी पावसाची नितांत गरज असताना पावसाचा दीर्घकाळ खंड पडला. परिणामी खरीप पिकांच्या उत्पन्नात प्रचंड प्रमाणात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदा मृग नक्षत्रात सात ते दहा जून पर्यंत पाऊस पडला. या काळात घाई गडबडीत ज्या शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली त्यांच्या शेतातील पिके समाधानकारक होती. परंतु संततधार पावसाने पिकांची अवस्था बिकट झाली. सोयाबीन पेरणी नंतरही पावसाने दडी मारली होती. त्यामुळे सखल भागातील पिक उगवले. परंतु उशिरा आलेल्या पावसाने कसेबसे पिके उगवली.
ठेक्याने शेती करणारे शेतकरी चिंतेत
अनेक शेतकऱ्यांकडे जमीन कमी असल्यामुळे ते दुसऱ्याचे शेत एक, दोन वर्षांसाठी ढेक्याने करून उत्पन्न घेतात. यावर्षी कोरडवाहू शेती दहा ते बारा हजार रुपये तर ओलिताची सोय असलेली शेती चौदा ते पंधरा हजार रुपये प्रति एकरी प्रमाणे भाव आहे. उत्पन्नात घट झाल्यास सर्व खर्च डोईजड होणार आहे. शिवाय नुकसानभरपाई देखील शेत मालकाला मिळत असल्याने ठेक्याने शेती करणारे शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहतात. ना उत्पन्न ना नुकसान भरपाई अशी अवस्था ठेक्याने शेत करणाऱ्याची झालेली असते.