भास्कर राऊत, मारेगाव : तालुक्यात सतत होणाऱ्या आत्महत्या प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. करणवाडी येथील एका 30 वर्षीय विवाहित युवकाने शुक्रवार 17 जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रशांत अरुण काळे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृतक प्रशांत काळे याची करणवाडी येथे राहत्या घराबाहेर किराणा दुकान आहे. शुक्रवारी सायंकाळी पाऊस येऊन गावाचा वीज पुरवठा खंडित झाला होता. अशातच दुकान बंद करुन प्रशांत आपल्या खोलीत गेला. त्यावेळी प्रशांतचे आई, वडील व पत्नी घरात होते. रात्री 9.30 वाजता दरम्यान प्रशांत खोलीतच गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिस घटनास्थळ पोहोचले. मृतदेहाचा पंचनामा करुन पोस्टमार्टमसाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. मृतक प्रशांतच्या मागे आई, वडील पत्नी आणि फक्त 4 महिन्याचा बाळ आहे. प्रशांतने आत्महत्या सारखा टोकाचा पाऊल का उचलले याबाबत अद्याप कळू शकले नाही.