वाद सोडवायला गेलेल्या शिक्षकाला बेदम मारहाण

विवेक तोटेवार, वणी: वणीतील सेवानगर परिसरात 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास 5 लोकांनी एका शिक्षकाला बेदम मारहाण केली. गणेशपूर चौफुली जवळ ही घटना घडली. या मारहाणीत शिक्षक जबर जखमी झाले आहे. विलास महादेव टोंगे (36) रा. वासेकर ले आऊट वणी असे शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीवरून 5 जणांविरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी विलास महादेव टोंगे (36) हे तालुक्यातील निवली येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. 16 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ते प्लॉट पाहण्याकरिता आपला मित्र सुनील अजाबराव क्षीरसागर यांच्यासोबत गणेशपूर रस्त्याने जात होते. गणेशपूर चौफुली जवळ त्यांना काही लोकांमध्ये वाद सुरू असलेला दिसला. त्यांनी जाऊन बघितले असता दोघे इसम हे विलास यांचा मित्र प्रवीण भोयर यांच्यासोबत वाद घालत होते.

त्यावेळी विलास यांनी प्रवीणला 112 क्रमांकावर कॉल करण्यास सांगितले. मात्र या मुळे चिडून दोघांनी विलासला मारण्यास सुरवात केली. त्यानंतर तिथे पुन्हा तिघे जण आले व त्यांनीही विलासला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने जवळ पडलेल्या दगडाने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. परंतु विलासने हाताने अडविल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर त्यांनी लथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या मारहाणीत विलासच्या हाताला, पायाला व छातीवर दुखावत झाली आहे. उपचारादरम्यान त्यांच्या डाव्या कानाचा पडदा फाटला असल्याची माहिती आहे. त्यांनी उपचार करून आज वणी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून वणी पोलिसात विक्की हारोडे (31) रा सेवानगर वणी, पवन चांदेकर (28) सेवानगर, पीटर उर्फ रुपेश बोढे (27) गणेशपूर, मयूर शेंडे (26) गणेशपूर, एक अनोळखी इसम आशा पाच जणांवर भादंविच्या कलम 143, 147, 149, 294, 325, 323, 504, 506 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास सपोनि माया चाटसे करीत आहे.

Lead Story