भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील दांडगाव जवळ असलेल्या नाल्यामध्ये एका अज्ञात महिलेचे प्रेत आढळून आले. पूर ओसरत आल्यानंतर आढळून आलेल्या या महिलेच्या प्रेतामुळे अनेक शंका कुशंकाना पेव फुटले आहे. महिलेची आत्महत्या की घातपात हे अद्याप अस्पष्ट असून परिसरात मात्र चर्चाना उधाण आले आहे.
मारेगाव तालूक्याच्या उत्तर सीमेवरून वर्धा नदी वाहते. या नदीला लागून अनेक छोटे मोठे नाले आहेत. असाच एक नाला दांडगाव ते मार्डा डॅम दरम्यान आहे. या नाल्यामध्ये आज रविवारी दि.17 जुलैला दुपारी 3 च्या दरम्यान एका अज्ञात महिलेचे प्रेत वाहत आल्याचे आढळून आले.
काही लोकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी याची माहिती पोलीस पाटील यांना दिली. पोलीस पाटलांनी याची माहिती मारेगाव पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे बघ्याची एकच गर्दी तिथे उसळली होती.
या महिलेचे प्रेत नाल्यात एका फांदीला लटकून होते. ही महिला अंदाजे 60 वर्षाची असावी. महिलेच्या अंगावर निळ्या रंगाची साडी आहे. तसेच या महिलेच्या एकाच पायात चप्पल असून महिलेच्या अंगावरील साडीही अस्ताव्यस्त अवस्थेत असल्याचे आढळून आले.
परिसरातील नागरिकांकडून माहिती घेतली असता परिसरातून कोणीही बेपत्ता नसल्याचे कळले. तसेच मारेगाव पोलीस स्टेशनमधून याविषयी माहिती घेतली असता एकाही महिलेच्या मिसिंगचा रिपोर्ट नसल्याचे कळले. यावरून ही आत्महत्या की काही घातपात असा संशय व्यक्त केल्या जात आहे.