शाळेच्या सुरक्षा रक्षकाला काठीने मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी : बिअरची काचेची बाटली शाळा समोर फेकू नका, असं म्हटलंय म्हणून शाळेच्या सिक्युरिटी गार्डला एका युवकाने काठीने तसेच थापड बुक्क्यांनी मारहाण केली. सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी पिंटू उकनकर नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

येथील गंगशेट्टीवार मंगल कार्यालय परिसरात मक्रून स्टूडेंट अकॅडमी शाळा आहे. विठ्ठलवाडी भागात वास्तव्यास असणारा सनी कैलाशचंद्र शर्मा हा शाळेत नाईट सिक्युरिटी गार्ड म्हणून कामावर आहे. दिनांक 10 जून रोजी कर्तव्यावर असताना रात्री 8 वाजता दरम्यान शाळेच्या समोर काचेची बाटली फेकल्याची आवाज आली. सनी शर्मा यांनी बाहेर जाऊन पाहिले असता काही तरुण मद्य प्राशन करताना दिसून आले. 

सुरक्षा रक्षक सनी शर्मा यांनी शाळा परिसरात बिअरची बाटली फेकू नको असे त्या तरुणांना सांगितले. यावर पिंटू उकनकर नावाच्या तरुणाने सनी शर्मा यास शिवीगाळ करीत काठीने तसेच थापड बुक्क्यांनी नाकावर, ओठावर व छातीवर मारहाण केली. यापुढे मला काही बोलायचं नाही अशी धमकी दिली. घटनास्थळी उपस्थित एका प्रतिष्ठित नागरिक यांनी सनी शर्मा याला मदत करून आरोपीकडून सोडविले. फिर्यादी सनी कैलाशचंद्र शर्मा (36) रा. विठ्ठलवाडी वणी यांच्या तक्रारीवरून वणी पोलिस स्टेशनमध्ये आरोपी पिंटू उकनकर् रा. वणी विरुद्ध कलम 324, 34, 504, 506 भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Lead StoryMacroon Academysecurity gaurdWani police