जितेंद्र कोठारी, वणी: अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणा-या तरुणास दुर्गापूर जिल्हा चंद्रपूर येथून अटक केली. तर बालिकाला ताब्यात घेऊन तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. गुलाम रजब अली (22) रा. राजूर ता. वणी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला न्यालायलीन कोठडी सुनावली आहे.
पीडिता ही वर्षांची असून ती तिच्या आजीसह तालुक्यातील एका गावात राहते. सोमवारी दिनांक 10 जुलै रोजी ती घरी झोपली होती. पहाटे 4 वाजताच्या सुमारास आजीला जाग आली असता तिला घरी नात आढळून आली नाही. तिने परिसरात शोध घेतला तसेच ती आढळून आली नाही. त्यामुळे नातीला कुणीतरी तरी फूस लावून पळवून नेल्याचा आजीला संशय आला. तिने वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता त्यांना राजूर येथील आरोपी गुलाम रजब अली या तरुणाबाबत माहिती मिळाली. आरोपीने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याची माहिती त्यांना मिळाली. दरम्यान आरोपीही बेपत्ता असल्याने आरोपीने पीडितेला पळवल्याचे जवळपास पक्के झाले. पोलिसांनी शोध घेतला असता पीडिता ही दुर्गापूर येथील आरोपीच्या एका नातेवाईकाकडे असल्याची माहिती त्यांना मिळाली. ठाणेदार अजीत जाधव यांनी तात्काळ या ठिकाणी पथक पाठवले. तिथे बालिका व आरोपी दोघेही आढळून आले. त्यांना वणीत आणण्यात आले.
पीडितेच्या बयानावरून आरोपीवर भादंविच्या कलम 366 (अ) 376 (2) (N) यासह बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण (पोस्को) च्या कलम 4,6 व 17 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली. प्रकरणाचा तपास पोउनि आशिष झिमटे करीत आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोड, अपर पोलीस अधिक्षक पीयूष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात व पोनि अजीत जाधव यांच्या आदेशाने पोउनि आशीष झिमटे, पोकॉ शुभम सोनुले, शंकर चौधरी यांनी केली.