विवेक तोटेवार, वणी: 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध होत आहे. या घटनेने प्रत्येक भारतवासीयांना हादरून सोडले आहे. या निमित्त शुक्रवारी वणीतील सर्वपक्षीयांनी शिवाजी चौकात भारतमातेच्या वीर पुत्रांना श्रद्धांजली वाहली.
पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात 42 जवानांना वीर मरण आले. यात अनेक जण जखमीही झाले आहेत. मृतांची संख्या वाढतच आहे. भारतावर झालेल्या या हल्ल्याचा सर्वत्र निषेध होत आहे. या श्रद्धांजली कार्यक्रमात सर्व पक्षांनी आपआपसतील मतभेद विसरून एकाच मंचावर जमले होते. या कार्यक्रमात अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. रंगरेज चाचा यांनी पाकिस्तानवर टीकास्त्र सोडले व पाकिस्तान दहशतवाद्यांना शह देत असल्याचा आरोप केला.
महेंद्र लोढा यांनी आपले मत व्यक्त करतांना म्हटले की, अजून सरकार किती दिवस चूप राहणार आहे. आणि आपण कित्येक दिवस आपल्या भारत मातेच्या पुत्रांचे जीव गमवित राहणार आहे. आता कठोर कारवाई करावी. असे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे राकेश खुराणा, तारेन्द्र बोर्डे, अखिल सतोकर, संजय पिंपळशेंडे यांनीही आपले मत व्यक्त केले. यावेळी बहुसंख्येने वणीकर जनता उपस्थित होती. कार्यक्रमाचे संचालन प्रवीण खानझोडे यांनी केले.