जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथे फर्निचरचे काम करून ॲक्टिव्हा दुचाकीने गावाकडे जाताना एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. मंगळवारी दिनांक 13 जून रात्री 12 वाजताच्या दरम्यान वणी-वरोरा मार्गावरील सावर्लाजवळ ही घटना घडली. राहुल शालिक झोडे (29) रा. एकार्जूना, ता. वरोरा, जि. चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार नांदेपेरा मार्गावर एका कार्यालयाचे मंगळवारी उद्घाटन होते. या कार्यालयात फर्निचरचे काम करणारा वरोरा येथील कारागीर उद्घाटन कार्यक्रमासाठी वणीत आला होता. कार्यक्रम आटोपून राहुल झोडे हा रात्री 9 वाजता दरम्यान आपल्या ॲक्टिवा दुचाकीने वरोरा जाण्यासाठी निघाला होता. रात्री 3.30 वाजता डायल 112 वर एका व्यक्तीने कॉल करून सुशगांगा कॉलेज जवळ एका दुचाकीस्वार इसमाचा अपघात झाल्याची माहिती दिली.
माहितीवरुन रात्री ड्युटीवरील सपोनि माया चाटसे तात्काळ पोलिस वाहन घेऊन घटनास्थळी पोहचल्या. तेव्हा सदर युवक रस्त्यावर मृत अवस्थेत पडून होता. दुचाकीच्या डिक्कीमध्ये मिळालेल्या बँकेच्या पासबुक वरून मृत युवक एकार्जूना येथील राहुल झोडे असल्याची ओळख पटली. प्राथमिक तपासात दुचाकी स्लीप होऊन डिव्हायडरवर आदळल्याने अपघात घडल्याचे दिसून आले.
नांदेपेरा रोडवरील एका दुकानाच्या फर्निचरचे काम राहुलने घेतले होते. ते काम त्याने वेळेत पूर्ण देखील केले. मंगळवारी दुकानाचे उद्घाटन असल्याने तो दिवसभर उद्घाटनाच्या ठिकाणी होता. उद्घाटनाच्या संपूर्ण तयारीच्या कामातही राहुल हातभार लावत होता. मात्र सकाळी त्याच्या मृत्यूची बातमी आली.
पोलिसांनी मृतदेह पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात पाठविला. बुधवारी सकाळी शव विच्छेदन नंतर मृतक राहुल यांच्या मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. मृतक राहुल हा एकुलता मुलगा असून त्याच्या मागे तिची आई आणि एक विवाहित बहीण असल्याची माहिती आहे.