गिरीश कुबडे, खडकी: झरी तालुक्यातील खडकी (गणेशपूर) येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनासह लोकहिताचे उपक्रम घेण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून अभिवादन सोहळ्यानंतर सर्वधर्मीय सामूहिक विवाहसोहळा 14 एप्रिल रोजी गणेशपूर (बंडा) येथे झाला. या सोहळ्यात अतुल पोटे व वैशाली तिखट, राहुल चहारे व आम्रपालिका मंडलवार विवाहबद्ध झालेत. या सोहळ्यात कोणतेही कर्मकांड केेले गेले नाहीत. या सोहळ्याला खडकी-गणेशपूर गटग्रामपंचायतीच्या सरपंच रत्नमाला संतोष बरडे व मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
विवाहसोहळ्यात होणारी आर्थिक उधळपट्टी, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी अशा अनेक गोष्टींना फाटा बसतो. मानापमानाचे प्रसंग न येता समता, समानता व सामंजस्य कायम राहते. यावेळी संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक प्रतिष्ठान वणी निर्मित स्वरांगण संगीत संचाची लोकगीतांची मैफल झाली. संयोजक व मुख्य गायक संजय गोडे, गायिका रोशनी वासमवार, सहगायक दिगंबर ठाकरे, प्रसिद्ध कीबोर्डवादक प्रवीण ढगे, चंद्रपूरयेथील प्रसिद्ध ढोलकीवादक मंगेश घडिवार, ऑक्टोपॅडवादक अमोल दुधुलकर, व वादकचमूने संगिताची बाजू सांभाळली. विदर्भातील ख्यातनाम कवी, लेखक व निवेदक सुनील इंदुवामन यांनी संगीत मैफलीचे निवेदन केले.
या सोहळ्याचे यशस्वी आयोजन संतोष बरडे, काशिनाथ मालेकार, कुसुम मेश्राम, नंदा गाताडे, सुनंदा बरडे, विठ्ठल केराम, किरण मालेकर, अॅड. स्वाती भोसकर, कवी सचिन वाळके व गावकऱ्यांनी केले. नवदाम्पत्यांना भेटवस्तू व उपहार आयोजक संतोष बरडे यांनी दिले. गावकरी व नातेवाईक मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते