विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील परसोडा (कायर) येथील एका शेतक-याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. मोहन लटारी म्हसे (54) असे मृत शेतक-याचे नाव आहे. ते अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांची इजासन (गोडगाव) येथे 1 एकर शेती होती. त्यामुळे शेतीसह ते मजुरी देखील करायचे. ते परसोडा येथे कुटुंबीसह राहायचे. गुरुवारी दिनांक 11 जुलैे रोजी रात्रीच्या सुमारास जेवण झाल्यानंतर घरातील लोक खोलीत झोपले होते. तर मोहन हे गर्मीमुळे घराच्या व्हरांड्यात झोपले होते. मध्यरात्री त्यांनी घराच्या व्हरांड्यात असलेल्या फाट्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पहाटेच्या सुमारास त्यांचा मुलगा लघुशंकेसाठी उठला असता ही घटना उघडकीस आली. त्यांच्या कुटुबीयांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून प्रकरणाचा तपास मुकुटबन पोलीस करीत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्तपरिवार आहे.