विवेक तोटेवार, वणी: शहरातील मोमीनपुरा येथील युवकांनी ईद मिलादून्नबीच्या पावन पर्वावर समाजात बंधुभाव राहावा व आपण राहतो त्या ठिकाणाबाबत प्रेम, सदभाव व्यक्त करण्याकरिता ‘आय लव्ह मोमीनपुरा’ हा फलक उभारण्यात आला आहे. शनिवारी संध्याकाळी या फलकाचे सुप्रसिद्ध बिल्डर व सामाजिक कार्यकर्ते जमीर शेख उर्फ जम्मू आणि पत्रकार व व्यावसायिक फारुख चिनी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी वणीकरांनी हा फलक बघण्यास एकदा नक्की यावे असे आवाहन मोमीनपु-यातील तरुणांनी केले.
रविवार 9 ऑक्टोबर रोजी प्रेषित मोहम्मद यांच्या वाढदिवसानिमित्त वणी शहरात विविध उपक्रम राबविले जाते. प्रेषित मोहम्मद यांच्या वाढदिवसानिमित्त वणी शहरातील मोमीनपुरा येथे भव्य सजावट करण्यात आली. संपूर्ण परिसरात रोषणाई करण्यात आली. हे सर्व होत असताना मोमीनपुऱ्यातील युवकांच्या अथक प्रयत्नानंतर वणीतील मशिदीपुढे आय लव्ह मोमीनपुरा असे नाव असलेल्या गेटचे अनावरण करण्यात आले.
स्थानिक रहिवाशी यांच्या उपस्थितीत जमीर शेख उर्फ जम्मू आणि फारुख चिनी यांच्या हस्ते या फलकाचे उद्घाटन करण्यात आले. तौसिफ खान, फरहान शेख, अवेश खान, फैजान खान, सज्जाद शेख, जुनैद भाऊ, रिजवान शेख, अलीम खान, मौसीन मौला आदी युवकांनी या उपक्रमात पुढाकार घेतला. यावेळी मोठ्या संख्येने मोमिनपुरा येथील रहिवाशी उपस्थित होते.
ईद ए मिलादुन्नबी निमित्त वणी विविध कार्यक्रम
रविवारी वणी शहरात प्रेषित मोहमद पैगंबर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात सकाळी 10 वाजता जुलूस (प्रभातफेरी) काढण्यात येणार आहे. यानिमित्त शहरात ठिकठिकाणी अल्पोपहार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जमीर शेख यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली.