जितेंद्र कोठारी, वणी: वरो-यात दारू ढोसून स्थानिकांची वाद घालणे वणीतील दोन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. लोकांनी भर चौकात राडा करणा-या या दोन तरुणांची यथेच्छ धुलाई करून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मंगळवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास आनंदवन चौकात ही घटना घडली. दरम्यान लोकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.
सविस्तर वृत्त असे की वणीतील दोन तरुण मंगळवारी रात्री बाहेरगावाहून नागपूर रोडने वणी येथे परत येत होते. दरम्यान वरो-यातील आनंदवन चौकातील एका बारमध्ये ते दोघे दारू पिण्यासाठी थांबले. त्यांनी बारमध्ये चांगलीच दारू ढोसली. रात्री 9 वाजताच्या सुमारास ते वणीला परत जाण्यासाठी बारच्या बाहेर आले. दोघेही कारमध्ये बसले व कार रिव्हर्स घेत होते. दरम्यान वरोरा येथील बारच्या मागील वस्तीत राहत असलेली एक व्यक्ती कुटुंबासह एका कारने घरी जात होती. वणीतील तरुणांची कार रिव्हर्स घेताना वरो-यातील कारचालकाच्या कारला धक्का लागला.
सदर व्यक्ती कुटुंबासह असल्याने त्याने वणीतील तरुणांना काही म्हटले नाही. मात्र वणीतील ते दोन तरुण चांगलेच खवळलेले होते. मद्यधुंद अवस्थेत दोन्ही तरुण कारच्या बाहेर आले व वरो-यातील कारचालकावर चालून गेले. त्यांचे रौद्र रूप बघून कारचालक तिथून पळाला व बारच्या दिशेने धावत गेला. दरम्यान वरो-यातील व्यक्तीनी आरडा ओरड करून लोकांना बोलवले. त्याच वेळी गोँधळामुळे बारमधील लोक ही बाहेर आले.
मद्यधुंद अवस्थेत दोन तरुणांची दादागिरी बघून स्थानिक लोकांनी दोघांनाही चांगलाच चोप दिला. यावेळी घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रात्री उशिरा दोन्ही राडा करणा-या तरुणाला ताब्यात घेतले. त्यांच्यावर भादंविच्या कलम 279, 504, 506 नुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. सदर तरुण हे वणी तालुक्यातील वांजरी येथील असल्याची माहिती मिळाली आहे.
हे देखील वाचा: