बहुगुणी डेस्क, वणी: फुगे देण्याचे आमिष दाखवत एका अल्पवयीन मुलाने दुस-या एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गीक अत्याचार केला. गुरुवारी 4 जून रोजी मारेगाव तालुक्यात ही घटना घडली. या प्रकरणी पीडित मुलाच्या पालकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पीडित मुलगा हा मारेगाव तालुक्यातील रहिवासी आहे. त्याचे आई वडिल मजुरी करतात. दिवसभर तो आजी व आजोबाच्या सोबत राहतो. आरोपी हा त्यांच्या घराशेजारीच राहतो. गुरुवारी दिनांक 4 जून रोजी नेहमीप्रमाने पीडित मुलाचे आईवडील मजुरीला गेले होते. दुपारी पीडित मुलगा त्याच्या भावासह घराजवळ खेळत होता. दरम्यान आरोपी तिथे पोहोचला. त्याने दोघांना फुगे देण्याचे आमिष दाखवले.
फुगे मिळणार म्हणून दोन्ही भाऊ आरोपीच्या घरी गेले. आरोपीने पीडित मुलाच्या लहान भावाला समोरच्या खोलीत टीव्ही लावून दिली व पीडित मुलाला किचनमध्ये नेले. तिथे त्याने मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. जर कुणाला याबाबत सांगितले तर चाकूने जिवे मारण्याची धमकी दिली. संध्याकाळी पीडित मुलांचे पालक घरी आले. तेव्हा त्याने दुपारी घडलेली सर्व घटना कथन केली.
त्यानंतर पीडित मुलाचे आईवडील आरोपीच्या घरी गेले. मात्र आरोपी घरी नव्हता. पालकांनी पीडित मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर मुलाच्या पालकांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार दाखल केली. शनिवारी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. आरोपीला तात्काळ अटक केली व त्याची रवानगी यवतमाळ येथील बाल सुधार गृहात केली. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.