विवेक तोटेवार, वणी: घरात हाती रॉड घेतलेले 6 दरोडेखोर होते. तर बाहेर वार्डातील काही लोक हाती लाठी काठी घेऊन आले. प्रगतीनगरमध्ये राहत असलेल्या डोर्लीकर यांच्या घरी मध्यरात्री हा थरार घडला. त्यांच्या मुलीने समयसूचकता दाखवत मोबाईलवरून याची माहिती परिचितांना दिल्याने दरोडेखोरांचा प्लान फसला. नेमकं काय घडलं मध्यरात्री याचा मिनिट टू मिनिट थरार…
तक्रारीनुसार, सुभाष शंकरराव डोर्लीकर (58) हे शांतीपार्क प्रगतीनगर वणी येथील रहिवासी आहेत. त्यांचे ड्युप्लेक्स घर आहे. ते त्यांच्या पत्नीसह राहतात. तर त्यांचा मुलगा व मुलगी शिक्षणानिमित्त बाहेरगावी शिकतात. त्यांची मुलगी पदव्युत्तर शिक्षणाचे कॉलेज सुरु व्हायचे असल्याने सध्या घरी आलेली आहे. तळमजल्यावर सुभाष व पत्नी राहतात. तर वरच्या माळ्यावर त्यांचा मुला-मुलीचे बेडरुम आहेत. बुधवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी रात्री घरातील सर्व सभासद जेवण झाल्यानंतर झोपले होते.
सुभाष व त्यांच्या पत्नी तळमजल्यावर तर त्याची मुलगी ही वरच्या माळ्यावरील बेडरूममध्ये झोपली होती. रात्री 2.30 वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी 6 दरोडेखोर हाती रॉड, तांबी व डोक्यावर हेल्मेट लावून आलेत. त्यांनी आधी मुख्य गेटचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र लॉक मजबूत असल्याने दरोडेखोरांना मुख्य गेटमधून प्रवेश करता आला नाही. त्यानंतर त्यांनी मागच्या दाराकडे आपला मोर्चा वळवला. त्यांनी दरवाजा तांबी टाकून तोडला व खोलीत प्रवेश केला. त्यांनी तळमजल्यावरील खोलीतील सामान बाहेर काढले. मात्र त्यांच्या हाती विशेष असे काहीही लागले नाही.
मुलीची समयसुचकता व शेजारी झालेत गोळा
दरम्यान दरवाजा तोडण्याचा आवाज झाल्याने मुलीला जाग आली. तिला घरात दरोडेखोर शिरल्याची कुणकुण लागल्याने तिने तातडीने तिच्या भावाला फोन केला. तिच्या भावाने तातडीने वार्डातील काही मुलांना फोन करून तातडीने घरी जाण्यास सांगितले. रात्री वार्डातील काही लोक हाती लाठी काठी घेऊन डोर्लीकर यांच्या घरी पोहोचले. त्यांनी सुभाष यांच्या बेडरूमची खिडकी ठोकली व त्यांना उठवले. तुमच्या घरी दरोडखोर शिरल्याने तुम्ही बेडरूम बाहेर येऊ नका, असे सांगून त्यांना अलर्ट केले.
वार्डातील काही लोक घरी पोहचल्याचे कळताच मुलीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. आरडाओरड होताच ज्या दरवाज्यातून दरोडेखोर आलेत, त्याच मार्गाने दरोडेखोर पळत बाहेर आले. त्यांनी कारमध्ये बसत धूम ठोकली. हे सर्व अवघ्या 5-7 मिनिटात झाले. त्यानंतर डोर्लीकर यांनी तातडीने याची माहिती पोलीस स्टेशनला दिली. सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्यांना दरोडेखोरांची संख्या व त्यांनी घरात कसा प्रवेश केला याची माहिती झाली. त्यांनी सकाळी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सर्व आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 310 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा शोध वणी पोलीस करीत आहे.
दरोडेखोर बाहेर गावातील?
पळसोनी फाट्यावर दरोडेखोरांनी चौकीदाराचा खून करीत गोडावून लुटले होते. तर काही दिवसांआधी गोरक्षण जवळ मोबाईल शॉपी मालकाला शस्त्राचा धाक दाखवून लाखो रुपयांची रक्कम लुटली होती. या दोन्ही घटनेतील आरोपी हे बाहेरगावातील होते. तर पटवारी कॉलोनी लालगुडा येथे देखील चोरट्यांनी तलवारीचा धाक दाखवत लाखोंचा दरोडा टाकला होता. त्यातील आरोपी अद्यापही सापडलेले नाही. या दोन्ही घटनेतील आरोपीही बाहेर गावातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही घटना उघडकीस येताच शहरात एकच खळबळ उडून वणीकर दहशतीत आले आहेत.