जितेंद्र कोठारी, वणी : वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांची अकोला येथे बदली झाल्याने वणी पोलीस स्टेशनचे नवीन शिलेदार कोण ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्याकडे वणी पोलीस स्टेशनचे सूत्र सोपविले आहे. मुकुटबन पोलीस स्टेशनचे ठाणेदार असलेले पो. नि अजित जाधव यांनी सोमवार 26 जून रोजी वणी ठाणेदार पदाचे सूत्र स्वीकारले.
वणीचे मावळते ठाणेदार पो. नि. प्रदीप शिरस्कर यांनी 6 महिन्याच्या अल्प कालावधीत गुन्हेगारी व अवैध व्यवसायावर अंकुश लावण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यांची प्रशासकीय बदली झाली. नवीन ठाणेदार पो. नि. अजित जाधव शिस्तप्रिय आणि मनमिळाऊ स्वभावाचे आहे. मुकुटबन येथे त्यांच्या कार्यकाळात अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन त्यांनी केले. वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मटका, जुगार, कोळसा व भंगार चोरी, घरफोडी, सेक्स रॅकेट व इतर अवैध धंद्यावर अंकुश लावण्याचे आव्हान पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या पुढे आहे.