कृष्णानपूर येथे सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू
विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील कृष्णानपूर येथील संजय उद्धव ठावरी वय ३५ वर्ष यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना (दि.२५) गुरुवारी दुपारच्या दरम्यान घडली. संजय हा घराच्या अंगणात दुपारच्या वेळी बाजेवर वामकुक्षी घेत होता. त्यावेळी बोटाला सापाने दंश केला.
सदर बाब लक्षात येताच त्याला उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्याचा वाटेतच मृत्यू झाला. प्रेताचे शवविच्छेदन करून त्याचेवर कृष्णानपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.तो व्यवसायाने शिंपी होता. मृतकाच्या मागे आई, वडील, पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. संजयच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.