पुतण्याने काकांवरच केला कुऱ्हाडीने हल्ला

संपत्तीचा वाद अन् अनावर राग भोवला

9

बहुगुणी डेस्क, मुकुटबन: ‘बाप बडा ना भैय्या, सब से बडा रुपय्या’ ही हिंदी म्हण सर्वांनाच माहित आहे. याचा प्रत्यय मुकुटबन इथल्या घटनेने आला. काका आणि पुतण्यात संपत्तीचा वाद होता. कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यांच्यात नेहमीच शाब्दिक चकमक व्हायची. मात्र शुक्रवारच्या सायंकाळी अघटितच घडलं. स्थानिक मच्छिमार सोसायटीत नागोराव लच्छिराम तोकलवार राहतात. त्यांचा पुतण्या राजू तोकलवारही (22) त्यांच्याच शेजारी राहतो. शुक्रवारी पुन्हा त्यांच्यात वाद झाला. राजू त्याचे काका नागोराव तोकलवार यांच्या घरासमोर जाऊन, मोठ्या आवाजात वाद करीत होता. दरम्यान, त्याचे काका नागोराव यांनी घराबाहेर येऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, शब्दाने शब्द वाढत जाऊन दोघांमध्ये चांगलीच झटापट झाली.

राजूला त्याचा राग अनावर झाला. त्याने आपल्या काकांवर थेट कुऱ्हाडीनेच हल्ला केला. यात नागोराव गंभीर जखमी झालेत. त्यांच्या डोक्याला मोठी इजा झाली. याबाबतची तक्रार जखमीची मुलगी राणी नागोराव तोकलवार हिने मुकुटबन पोलिस ठाण्यात केली. तक्रारीवरून पोलिसांनी तरुण राजू तोकलवार याच्याविरूद्ध भादंवि ३०७, ३२६, ५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीस अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष मनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रवीण हिरे करीत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.