शेतीच्या कामासाठी वडील गेले शेतात, मात्र आढळला मुलाचा मृतदेह

निवली शेतशिवारात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

13

विवेक तोटेवार, वणी: निवली शेत शिवारात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शुभम अरविंद खिरटकर (25) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो निवली (सुंदरनगर) येथील रहिवासी होता. तो पिकअप वाहन चालवायचा. गेल्या दोन तीन दिवसांपासून तो अस्वस्थ होता व त्यामुळे तो कामालाही गेला नव्हता. बुधवारी दिनांक 7 फेब्रुवारी रोजी तो रात्री 10 वाजताच्या सुमारास तो त्याची दुचाकी घेऊन घरून निघून गेला. गावालगत खिरटकर कुटुंबीयांची शेती आहे. आज गुरुवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास शुभमचे वडील बैल पाहण्यासाठी शेतात गेले होते. दरम्यान शेतालगत त्यांना शुभमची दुचाकी उभी असलेली आढळली. त्यामुळे मुलगा शेतात असावा असे समजून त्यांनी मुलाचा शोध घेत असताना त्यांना शेताच्या धु-यावर एका झाडाला त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्यांनी तातडीने परिसरातील लोकांना बोलावून घेतले. घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना देण्यात आली. शिरपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात उत्तरिय तपासणीसाठी पाठवला. शुभमने आत्महत्या का केली? तो गेल्या 2-3 दिवसांपासून अस्वस्थ का होता, याचे कारण कळू शकले नाही. प्रकरणाचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.