आकर्षक देखावे, वाद्यांच्या तालावर आणि भाविकांच्या जल्लोषात निघाली भव्य शोभायात्रा

40

जितेंद्र कोठारी, वणी: श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त वणी शहरात निघालेल्या भव्य शोभायात्रेने वणीकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले. ढोल ताशा, डीजे, भजनी मंडळाच्या टाळ मृदंगाच्या गजरात व पारंपरिक लोककला-लोकसंस्कृतीचे वणीकरांना दर्शन घडवत ही शोभायात्रा शहरातून निघाली. या शोभायात्रेत भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. नयनरम्य देखावे, कलापथक, रोशनाई, बँडपथक यांच्या साथीने निघालेल्या या शोभायात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. बालाघाट येथील देखावे या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले. जय कन्हैया लाल की आणि जय श्रीरामच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. गेल्या आठवड्यापासून वणीत श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेने जन्माष्टमी सप्ताहाची सांगता झाली. या संपूर्ण उत्सवाला वणीकरांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल उत्सव समितीचे अध्यक्ष ऍड. कुणाल चोरडिया यांनी वणीकरांचे आभार मानले.

गुरुवारी दिनांक 7 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता वाजता अमृत भवन येथून शोभायात्रेला सुरुवात झाली. यावर्षी ट्रॅक्टर ऐवजी संपूर्ण रॅली ही रथात काढली गेली. ज्यात बग्गीमध्ये श्रीकृष्ण आणि रुक्मिणी विराजमान झाले होते. शेकडो चिमकले शोभायात्रेत बाळकृष्ण आणि गोपिका बनून सहभागी झाले होत्या. वाजत गाजत निघालेली ही शोभायात्रा खाती चौक, गांधी चौक, सर्वोदय चौक, टागोर चौक, आंबेडकर चौक, टिळक चौक, खाती चौक असे मार्गकर्मण करत शहरातून निघाली.

बालाघाटचा देखावा ठरले प्रमुख आकर्षण
शोभायात्रेत बालाघाट येथील महांकाली कलापथकाचा देखावा हे प्रमुख आकर्षण ठरले. प्रत्येक चौकात हे कला पथक वेगवेगळी वेषभूषा धारण करून रथावरून आपली कला सादर करत होते. या देखाव्याने वणीकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले. तर हिंगणघाट येथील भजनी मंडळाचे फ्युजन हे लक्षवेधी ठरले. डीजेच्या तालावर भजनी मंडळाच्या वाद्याचे फ्युजन करून त्यांनी केलेली पदावलीने शोभायात्रेत रंग भरले. तर गोंदिया येथील डीजे बँड पथकाने भाविकांचा उत्साह अखेर पर्यंत कायम ठेवला.

शोभायात्रेत सहभागी झालेल्या भाविकांसाठी ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तर गांधी चौकात अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. शोभायात्रा मार्गक्रमण करताना घराच्या माडीवरून, गॅलरीवरून लोकांनी या नयनरम्य दृष्यांचा आनंद घेतला. वणीतील सर्वात मोठी रॅली असे या रॅलीचे वर्णन केले गेले. शोभायात्रेची सांगता अमृत भवन येथे झाली. शांततेत मात्र उत्साहात निघालेल्या या रॅलीत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या शोभायात्रेत शहरातील मान्यवरांसह हजारो भाविक उपस्थित होते. या वर्षी महिलांचा सहभाग उल्लेखणीय होता. विशेष म्हणजे सर्व स्वयंसेवक हे ड्रेसकोडमध्ये होते. भव्य दिव्य असून शिस्तबद्धतेत निघालेली ही रॅली वणीच्या इतिहासात अभूतपूर्व ठरली. 

वणीकरांचे धन्यवाद – ऍड कुणाल चोरडिया
तरुणांनी गेल्या वर्षीपासून श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सवाची धुरा खांद्यावर त्यानंतर हे उत्सवाचे दुसरे वर्ष आहे. जन्माष्टमी निमित्त संपूर्ण आठवडा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण कालावधीत वणीकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत उत्सवता रंग भरले. त्यामुळे सर्व वणीकरांचे मी उत्सव समितीतर्फे आभार मानतो. यापुढेही समितीद्वारा विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 
– ऍड कुणाल चोरडिया, अध्यक्ष: श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती वणी

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मयूर गोयनका, हितेश गोडे, उमेश पोद्दार, रितेश फेरवाणी, शुभम मदान, राजू रिंगोले, स्वाती चोरडिया, विद्या मुथा, विशाल दुधबळे, निखिल मारगंडे, संतोष लक्षेटीवार, अमोल धानोरकर यांच्या सहकार्यातून समितीचे सदस्य व स्वयंसेवक उत्सवाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. 

पाहा शोभायात्रेतील विविध क्षण….

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.