लग्नकार्य आटोपून परतणा-या कॉलेज तरुणीची भर चौकात छेड

45

भास्कर राऊत, मारेगाव: लग्नकार्य आटोपून आपल्या नातेवाईकांच्या घरी परतणाऱ्या एका कॉलेज युवतीची एका मजनूने अश्लील भाषेत शिवीगाळ करत छेड काढली. आज रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. सदर प्रकारामुळे घाबरलेल्या युवतीने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दाखल केली. आरोपीला संध्याकाळी पोलिसांनी अटक केली. दरम्यान तक्रार दाखल करण्यासाठी तरुणीच्या भावासोबत ठाण्यात गेल्याने मित्राला आरोपीने भर चौकात मारहाण देखील केल्याची माहिती आहे.

मारेगाव येथील एका मंगल कार्यालयामध्ये पीडित कॉलेज तरुणी (22) ही लग्नकार्यासाठी गेली होती. दुपारी लग्नकार्य आटोपून ही तरुणी मारेगाव येथील आपल्या एका नातेवाईकाच्या घरी भेटण्यासाठी जात होती. दरम्यान मुलांच्या हॉस्टेलच्या मागून आरोपी नामे मनोज पुंडलिक माहुरे (27) रा. वेगाव, ता. मारेगाव हा पीडितेसमोर आला. त्याने मुलीचा हात पकडत तू माझ्याशी का बोलत नाही. तुला काय प्रॉब्लेम आहे, मी तुझा मुडदा पडतो असे म्हणत अश्लील भाषेत शिवीगाळ केली.

मुलाचा तो अवतार पाहून घाबरलेल्या मुलीने त्याच्यापासून कशीबशी सुटका करीत आपल्या नातेवाईकाच्या घरी गेली व त्यांना आपबीती सांगितली. झालेल्या प्रकारामुळे भाऊ तसेच नातेवाईक यांच्या सोबत पोलीस स्टेशन गाठले. तरुणीच्या तक्रारीवरून मारेगाव पोलीस ठाण्यात आरोपी मनोज विरोधात भादंविच्या कलम 354, 294,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी काही वेळातच आरोपीला अटक देखील केली.

मार्डी चौकातही आरोपीचा राडा 
आरोपीची तक्रार दाखल करायला युवतीच्या भावासोबत एक नातेवाईक आणि एक मित्र होता. तक्रार दाखल करून भावाचा मित्र घरी परत जात होता. दरम्यान आरोपीने मुलीच्या भावाच्या मित्राला गाठत तू तक्रार द्यायला का गेला होता? असा जाब विचारत त्याला मार्डी चौकात मारहाण केली. या घटनेने घाबरलेल्या मित्राने पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले परंतु तोपर्यंत आरोपी निघून गेला होता. मात्र मजनूचे सातत्याने होणारे कारनामे पाहून पोलिसांनी संध्याकाळच्या सुमारास या मजनूच्या मुसक्या आवळल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.