अमली पदार्थाचे सेवन करणा-यांविरोधात पोलिसांचे धाडसत्र

38

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील भीम नगर येथे एका तरुणाला गांजा ओढत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. रविवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. सध्या जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अमली पदार्थ सेवन करणा-यांवर कारवाईचा सपाटा सुरू आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. शहरात मोठ्या प्रमाणात तरुण व शाळकरी मुलं गांजाच्या आहारी गेले असून शहरातील ओसाड ठिकाण हे त्यांचा अड्डा बनला आहे. वणी पोलिसांनी ड्रग्स सप्लायरवर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा वणीकर व्यक्त करीत आहे.

सविस्तर वृत्त असे की सध्या अमली पदार्थांचे सेवन करणा-यांविरोधात पोलिसांच्या पथकाचे धाडसत्र सुरू आहे. त्यानुसार रविवारी दुपारी 4 वाजता पोलीस विभागाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भीमनगर येथे पोहोचले होते. तिथल्या एका सार्वजनिक ठिकाणी एक 27 वर्षीय तरुण हाती चिलीम ओढताना आढळला. पोलिसांनी सदर तरुणास ताब्यात घेऊन त्याच्या चिलिमची तपासणी केली असता तो गांजा ओढत असल्याचे निष्पन्न झाले. 

तरुणांची चौकशी केली असता तो तरुण मोमिनपुरा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपीला अटक केली व घटनेचा पंचनामा केला. आरोपीवर  गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 (NDPS) कायद्याच्या कलम 27 व 8 (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि अमोल मुडे यांच्या नेतृत्त्वात सुधीर पांडे, सुधीर पिदूरकर, रजनिकांत मडावी इत्यादींनी केली.   

शहरातील ओसाड ठिकाणं बनले गर्दुल्यांचा अड्डा
शहरातील अनेक ओसाड ठिकाणी गांजासारख्या मादक द्रव्यांचे सेवन होते. यात शाळकरी मुलांपासून ते कॉलेजच्या तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. व्यसनाधीन झालेले या मुल व तरुणांना अनेक वर्षांपासून गावातूनच गांजा मिळतो. हे सर्व चांगल्या घरातील मुलं असून या व्यसनामुळे त्यांची तरुणाई व्यर्थ जात आहे. गावाबाहेरील अनेक ओसाड लेआऊट, नदी रोडवरील मैदान, ओसाड बगिचा व मैदान हे सध्या गांजा फुकण्याचे ठिकाण झाले आहे. सदर गांजा हा शहरातूनच पुरवला जात असून हा माल तेलंगणातून येत असल्याची माहिती आहे. पोलिसांनी या ड्रग सप्लायर्सवर तातडीने कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा: 

ईदला येतोय भाईजान भेटीला… KKBKKJ ची ऍडव्हान्स बुकिंग सुरू

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.