शौचास जाण्याचे कारण सांगून गेलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता

25

जितेंद्र कोठारी, वणी: कॉलेजला सुटी लागल्याने आजी-आजोबाच्या गावी गेलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. शौचास जाण्याचे कारण सांगून मुलगी घराबाहेर पडली मात्र त्यानंतर ती घरी परतलीच नाही. त्यामुळे मुलीच्या पालकांनी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत याबाबत वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, पीडितेचे वडील हे वणीतील रहिवासी असून ते मजुरी करतात. पत्नी, दोन मुली व एका मुलगा असे त्यांचे कुटुंब आहे. त्यांची मोठी मुलगी (16) ही शहरातील एका कॉलेजमध्ये 11 वीला आहे. सोमवारी दिनांक 13 मार्च रोजी त्यांची मोठी मुलगी ही जवळच असलेल्या आपल्या आजोळी गेली होती. बुधवारी दिनांक 15 मार्च रोजी दुपारी 4 च्या सुमारास ती शौचास जाण्यासाठी घरून निघाली. मात्र त्यानंतर ती घरी परतली नाही.

नात घरी दिसत नसल्याने तिच्या आजी आजोबाने गावात तिचा शोध घेतला. मात्र ती गावात आढळून आली नाही. अखेर पीडितेच्या आजोबाने याची माहिती नातीच्या वडीलांना दिली. माहिती मिळताच मुलीचे आईवडील गावी पोहोचले. त्यांनी ओळखीच्या लोकांना आणि नातेवाईकांना फोन करून मुलीबाबत विचारणा केली. मात्र त्यांना मुलीचा पत्ता लागला नाही. अखेर त्यांना मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय आला.

मुलीच्या वडिलांनी वणीला येऊन याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे. गेल्या 10 दिवसात शौचास जाण्याचे कारण सांगून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीचे हे तिसरे प्रकरण आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंता वाढली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.