महिलेचा 9 महिन्याच्या बाळासह आत्महत्येचा प्रयत्न, आईचा मृत्यू

साडीचा फास सुटल्याने 9 महिन्याची चिमुकली बचावली.... पतीच्या निधनामुळे आलेल्या नैराश्यातून उचलले पाऊल

23

भास्कर राऊत, मारेगाव: पतीच्या मृत्यूच्या पश्चात  विरहात जीवन जगत असलेल्या एका महिलेने आपल्या 9 महिन्याच्या चिमुकलीसह साडीचा गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला, मात्र सुदैवाने फास सैल झाल्याने यात चिमुकली बचावली आहे. ही घटना मार्डी येथे आज सकाळी उघडकीस आली. रोशनी आशिष झाडे (वय अंदाजे 24) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर बाळावर सध्या वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

रोशनी हिचे काही वर्षांपूर्वी हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर येथील आशिष झाडे यांच्याशी विवाह झाला होता. यांच्या या संसाररूपी वेलीवर एक कन्यारत्न सुद्धा जन्माला आले. असाच यांचा सुखाने संसार सुरु असताना मागील दोन महिन्यापूर्वी आशिष झाडे यांचा आकस्मित मृत्यू झाला. त्यामुळे ती मार्डी येथे माहेरी आली होती.

पतीच्या निधनानंतर रोशनी ही सतत मानसिक तणावात असायची. आता आपण मुलीचा सांभाळ कसा करायचा अशा विवंचनेत असायची. आज मंगळवारी दिनांक 7 जून रोजी रोशनीचे वडील हे कामानिमित्त बाहेर गेले होते. तर आई घराबाहेर होती. ही संधी साधून रोशनीने सकाळी साडे 6 ते 7 वाजताच्या दरम्यान तिच्या 9 महिन्याच्या बाळाला घेऊन घरातील पंख्याला गळफास साडीने गळफास घेत आत्महत्या केली. काही वेळाने ही घटना उघडकीस आली. यात रोशनीचा मृत्यू झाला होता. 

फास सैल झाला आणि चिमुकली बचावली…
रोशनी ही आपल्या एका मुलीसह राहात होती. मुलीची जबाबदारी आणि पतीच्या अकाली मृत्यूमुळे रोशनी ही एकाकी झाली होती. त्यातून ती मानसिक तणावात गेली होती. त्यामुळे तिने चिमुकलीसह आत्महत्या करण्याचा निश्चय केला. मात्र दैव बलवत्तर म्हणून चिमुकलीच्या गळ्यातील साडीचा फास सैल झाल. जेव्हा ही घटना उघडकीस आली तेव्हा बाळ जिवंत असल्याचे आढळून आले. त्यामुळे बाळाला लगेच वणीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर तिथे उपचार सुरू आहे. 

अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीत आई व वडिलांचे छत्र हरवल्याने 9 महिन्यांची चिमुकली पोरकी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रोशनीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथे आणण्यात आला असून घटनेचा मारेगाव पोलीस तपास करीत आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.