म्हैसदोडका येथील वृद्ध शेतक-याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

सगणापूर शेतशिवारातील विहिरीत आढळला मृतदेह

0 19

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील म्हैसदोडका येथील एका 80 वर्षीय वृद्ध शेतक-याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. श्रीराम गणू मेश्राम (वय अंदाजे 80) असे आत्महत्या करणा-या शेतक-याचे नाव आहे. गावाशेजारीच सगणापूर शेतशिवारात एका विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. काल दुपारपासून ते बेपत्ता होते.

मृतक श्रीराम गणू मेश्राम (वय अंदाजे 80) हे म्हैसदोडका येथील रहिवाशी होते. त्यांच्याकडे सिंगिंगची जमीन होती. अर्धा एकर जमीन त्यांनी गावठाणाला दिली होती. श्रीराम हे काल दिनांक 6 जुलै दुपारी 4-5 वाजताच्या सुमारास घरून निघून गेले होते. मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत ते घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. तसेच नातेवाईकांकडे कॉल करून विचारणा केली. मात्र त्यांच्याबाबत माहिती मिळू शकली नाही.

गावाशेजारीच सगणापूर शेतशिवारात विठ्ठल ठावरी यांचे शेत आहे. आज दिनांक 7 जुलै रोजी सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास त्यांना विहिरीजवळ चप्पल, काठी व कपडे आढळून आले. त्यांनी विहिरीत डोकाऊन पाहिले असता त्यात एक मृतदेह तरंगत दिसला. याबाबत पोलीस पाटलांना माहिती देण्यात आली. घटना उघडकीस येताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

संध्याकाळपासून श्रीराम हे बेपत्ता असल्याने तसेच त्यांची काठी व चप्पल दिसल्याने तो मृतदेह श्रीराम यांचा असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. विहिरीत गाळ टाकून मृतदेह बाहेर काढण्यात आला असता तो मृतदेह श्रीराम यांचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

विहिरीशेजारी आढळले काठी, चप्पल आणि कपडे

आधीही घरून निघून गेल्याची माहिती
श्रीराम यांच्यावर कर्ज असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन ठिक राहत नव्हते. याआधीही ते अनेकदा घरून निघून गेले होते. मात्र लवकरच त्यांचा शोध लागायचा. ते संध्याकाळच्या सुमारास नवरगावला जायचे. यावेळीही संध्याकाळी परत न आल्याने ते नवरगाव येथे गेले असावे असा कुटुंबीयांचा अंदाज होता. मात्र सकाळी त्यांचा मृतदेहच आढळून आला. 

श्रीराम यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, 2 विवाहित मुली नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.