मांगुर्ला येथे घरात घुसून महिलेचा विनयभंग

इसमावर गुन्हा दाखल

0 15

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांगुर्ला येथील इसमाने गावातीलच महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मांगुर्ला येथील पीडित महिला ही आपल्या एक मुलगा व मुलीसोबत राहते. पती नसल्याने सदर महिला रोजमजुरी करून आपले उदरनिर्वाह करते. पाऊस सुरू असल्यामुळे शेतीची मजुरी नसल्याने सध्या ती घरीच राहत होती.

18 ऑगस्ट रोजी रात्री 12.30 वाजताच्या दरम्यान आरोपी संजय देवराव पंधरे (40) हा मातीच्या बांधलेल्या घराच्या भीतीवरून उडी घेऊन पीडित महिलेच्या घरात घुसला व झोपून असलेल्या महिलेचा वाईट उद्देशाने हात पकडला. हात पकडताच महिलेला जाग आली.

आरोपी संजय याने महिलेला आरडाओरड करू नको नाहीतर ठार मारेण अशी धमकी दिली. मात्र पीडित महिलेने त्याच्या धमकीला भीक न घालता जोराने आरडाओरड केला असता आरोपी घराचा दरवाजा उघडून पळून गेला.

सकाळी पीडित महिलेने मुकुटबन पोलीस स्टेशन गाठले व याबाबत तक्रार दिली. यावरून पोलिसांनी कलम ३५४, ४५१, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीच्या शोधात पोलीस रवाना झाले होते.

वृत्त लिहेपर्यंत आरोपीला अटक झाली नव्हती. प्रकरणाचा तपास ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड प्रवीण ताडकोकुलवार व राम गडदे करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.