ज्योतिबा पोटे, मारेगाव: दहावीच्या निकालात वणी उपविभागात मारेगाव तालुक्याचा नंबर ढँग आला असून तालुक्याचा निकाल केवळ ५३.७०% लागला आहे. तालुक्यातील म्हैसदोडका शाळेचा निकाल तर ५.२६% लागल्याने शिक्षकांच्या शिकवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मारेगाव तालुका आदिवासी बहुल तालुका असला तरी शिक्षणाचे माध्यम बरेच निर्माण झाले आहे. त्यामानाने झरी तालुक्यात शिक्षणाच्या सोयीसुविधा कमी आहे. मात्र मारेगावने झरीला देखील मागे टाकत शेवटून पहिला नंबर मिळवला आहे. निकालाची टक्केवारी घसरल्याने ही शिक्षक व पालकासाठी चिंतनाची बाब ठरत आहे.
घसरलेल्या निकालात स्मार्टफोनचा मोठा वाटा असल्याचा कयास सर्वसामान्य लावत आहे. केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षक व पालक यांच्या हातात पुस्तकांच्या ऐवजी मोबाईल दिसून आला. त्याचा परिणाम या वर्षीच्या निकालावर झाला असल्याचं मत व्यक्त होत आहे. दरवेळेला तालुक्यातुन बाजी मारणाऱ्या मुली या वर्षी निकालात मागे पडल्या. याचा अर्थ अभ्यासात दुर्लक्ष व मोबाइलवर लक्ष असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यामध्ये दरवर्षी दोन तीन शाळेचा निकाल १००% लागायचा. मात्र यावर्षी ही परंपरा खंडित झाली आहे.
सोबत विद्यार्थ्यांना मिळणारे प्रात्याक्षिक गुणांची दांडीही निकालास कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. परिसरातील एका विद्यार्थी कॉन्सलरशी बोलल्यावर त्यांनी सांगितले की यावर्षी ऍन्ड्रॉईड मोबाईलचा फटका मोठा दिसून आला आहे. त्याला मोठ्या प्रमाणात पालक दोषी आहेत. मोबाईलमध्ये पुस्तकापेक्षा रात्र जागवण्याची क्षमता जास्त असल्याने विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकाऐवजी मोबाईल अधिक वेळ दिसून आला.
